कानठळ्या बसविणारे दारूकाम कोण रोखणार?
By admin | Published: September 9, 2014 02:11 AM2014-09-09T02:11:13+5:302014-09-09T02:11:24+5:30
पणजी : पणजीतील अकरा दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन उत्साहात आणि भव्य मिरवणुकीने झाले. कानठळ्या बसणारे फटाके आणि लाखो
पणजी : पणजीतील अकरा दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन उत्साहात आणि भव्य मिरवणुकीने झाले. कानठळ्या बसणारे फटाके आणि लाखो रुपयांचा चुराडा करणारे प्रदूषणकारी दारूकाम यंदाच्या चतुर्थीलाही पाहायला मिळाले.
पणजीतील चार ठिकाणच्या ११ दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही विसर्जनाच्या भव्य मिरवणुकी झाल्या; परंतु पूजनाच्या ठिकाणी, मिरवणुकीच्या ठिकाणी आणि विसर्जनाच्या ठिकाणी फटाके चालू होते. जो प्रकार ११ दिवसांच्या मूर्ती विसर्जनाच्या वेळी तोच प्रकार ९ दिवसांच्या विसर्जनाच्यावेळीही आढळला. रात्री उशिरापर्यंत फटाके आणि दारूकामाची आतषबाजी चालू होती.
सांतइनेज येथील एका मंडळाच्या गणेशमूर्ती विसर्जनाच्यावेळी मध्यरात्र उलटून दोन वाजेपर्यंत फटाके लावणे चालू होते. कानठळ्या बसणारे आवाज निघत असल्यामुळे या परिसरात राहणाऱ्यांना त्रास सहन करावा लागला. रात्री कामावरून दुचाकीवरून जाणाऱ्या वाहनांपुढे सुतळी ंबाँब टाकले जात होते.
चतुर्थीला फटाक्यांची आतषबाजी आता कमी प्रमाणात होत असली तरी सार्वजनिक गणेशोत्सवात हजारो रुपयांचा चुराडा हा केवळ फटाक्यांसाठी आणि दारूकामासाठी केला जात आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आता प्रत्येक वाड्यावाड्यावर असतात. देणग्या घेऊन मिळविलेला पैसाही फटाक्यांवर खर्च केला जातो. काही गणेशोत्सव मंडळे फटाक्यांवर आणि दारूकामावर पैसे खर्च करणार नाही, असे ठरावही घेतात.
काही मंडळाच्या घटनेचाच तो भाग असतो; परंतु ऐनवेळी कुणीतरी पुरस्कृत केल्याचे कारण सांगून फटाके लावण्याचे प्रकारही अनेक घडत आहेत. पणजीतील एका गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्याने खासगीत माहिती देताना सांगितले की, ते कमीत कमी एक लाख रुपये खर्च केवळ दारूकामावर करतात. त्यासाठी त्यांना पुरस्कर्तेही मिळतात. ही केवळ एका मंडळाची कथा नसून अनेक मंडळांकडून हाच कित्ता गिरविला जात आहे.