गोव्यात पर्यटन का रोडावले?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 06:30 AM2020-01-05T06:30:58+5:302020-01-05T06:35:01+5:30
गोव्यात पर्यटन रोडावल्यानंतर सरकारवर खूप टीका झाली.
- राजू नायक
गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर ३१ डिसेंबरची बेहोशी रात्र संपल्यावर एक अत्यंत किळसवाणे चित्र उभे राहते. किना-यावर लोक दारू ढोसून पडलेले, बाटल्या व काचा विखुरलेल्या, प्लास्टिक कचरा... त्यानंतर काही दिवस गोव्यातील प्रसार माध्यमे आक्रंदतात. म्हणतात, या प्रकारचे पर्यटन तुम्हाला हवे आहे काय? एका बाजूला ‘सगबर्न’सारखे इलेक्ट्रॉनिक महोत्सव- ज्याची बदनामी प्रत्येक वर्षी अमली पदार्थांच्या अतिसेवनाने होणा-या मृत्यूमुळे होते तर दुस-या बाजूला हे असे बीभत्स किळसवाणे चित्र.
या वेळी गोव्यात कमीच पर्यटक आलेत. जागतिक प्रवासी तर खूप थोडे आले. अलीकडे ‘थॉमस कूक’सारख्या प्रतिष्ठित प्रवासी कंपन्या बंद झाल्यानंतर काही चांगल्या देशांतून येणारे पर्यटक कमीच झाले आहेत. एकेकाळी ब्रिटन, जर्मनीसह युरोपीय देशांतील पर्यटकांची गोव्यात रीघ असायची. त्यानंतर इस्रायली पर्यटक येणे सुरू झाले. आता त्यांच्या जोडीला रशियन पर्यटक येतात. परंतु या दर्जाच्या पर्यटकांबद्दल गोव्यात फारसे चांगले बोलले जात नाही. कारण हे एकतर अत्यंत कफल्लक पर्यटक असतात, त्यांच्यामुळे चांगल्या दर्जाचे प्रवासीही येणे थांबवितात.
गोव्यात पर्यटन रोडावल्यानंतर सरकारवर खूप टीका झाली. विशेषत: पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांच्या वर्तनाबद्दल समाज माध्यमांनी त्यांना खूप झोडून काढले. राज्य सरकारने दृष्टी नसलेला मंत्री नेमला आहे, अशी टीका झाली. परंतु सरकारलाच पर्यटनाबद्दल योग्य दृष्टिकोन नसल्याची टीका नेहमीच होते. मद्य, अमली पदार्थ, सेक्स, जुगार अशा समाजाला फारशा न रुचणा-या गोष्टींनी पर्यटनाला ग्रासले आहे, यात तथ्य आहे. त्यामुळे कुटुंबवत्सल प्रवासी गोव्याकडे पाठ फिरवू लागला आहे.
शिवाय आशियातील इतर अनेक पर्यटन केंद्रे गोव्यापेक्षा स्वस्त आहेत. जे चांगल्या दर्जाचे प्रवासी येतात ते राजस्थान किंवा केरळला भेट देतात. तेथे गोव्यापेक्षाही स्वच्छ व नितळ पर्यटन असते. गोव्यात गेल्या अनेक वर्षांत ज्या लॉबी तयार झाल्या आहेत, त्यांनी या क्षेत्रात नवीन कल्पक योजना राबविण्यालाच विरोध केला आहे. विशेषत: टॅक्सीवाल्यांचा मोठा दबाव असतो, जे रेडिओ टॅक्सींना मज्जाव करतात. शॅकवाल्यांची किनाºयावर दादागिरी चालते. आता कॅसिनो लॉबीही तयार झाली आहे.
राज्य सरकारने आता पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांबरोबर बसून गंभीर चर्चा सुरू करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. आम्हाला कोणत्या प्रकारचे पर्यटन हवे आहे, त्यासाठी कोणत्या पायाभूत सोयी हव्या आहेत, सुरक्षा व्यवस्थेत काय बदल हवे आहेत, स्वच्छता-पर्यावरण याबाबत काय पावले उचलावीत, असे ते प्रश्न आहेत. पर्यटन व्यावसायिक म्हणतात, राज्य सरकारने गांभीर्याने कृती केली नाही, तर ज्या पद्धतीने खाण व्यवसाय बंद पडला, तसेच पर्यटनाचे होऊ शकते. या वर्षीच्या परिस्थितीने वास्तवाची गंभीर जाणीव सरकारला करून दिली आहे.