पतीकडून पत्नीचा खून
By admin | Published: September 13, 2014 01:26 AM2014-09-13T01:26:51+5:302014-09-13T01:26:51+5:30
मडगाव : पतीने पत्नीवर चाकूने हल्ला चढवून तिचा खून करण्याची खळबळजनक घटना कट्टा-फातर्पा येथे शुक्रवारी सकाळी घडली.
मडगाव : पतीने पत्नीवर चाकूने हल्ला चढवून तिचा खून करण्याची खळबळजनक घटना कट्टा-फातर्पा येथे शुक्रवारी सकाळी घडली. घटनेनंतर जयेश नाईक (वय ३६) हा फरार झाला आहे. मृत जिया नाईक (वय ३५) हिचा मृतदेह शवचिकित्सेसाठी हॉस्पिसियोच्या शवागारात ठेवला आहे. पत्नीच्या चरित्र्याबाबत संशयाने घेरल्यानेच जयेशने जियाचा निर्घृण खून केला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे.
जयेशला दारूचेही व्यसन जडले होते. तो जियाकडे सतत पैशाचा तगादा लावत असे, पैशासाठी सोन्याचे दागिने विक, असे सांगून तो तिला मारबडवही करत होता.
खुनाची घटना म्हणून या प्रकरणाची कुंकळ्ळी पोलिसांनी नोंद केली आहे. जयेशवर भादंसंच्या ३0२ कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. त्याचा शोध चालू असल्याची माहिती उपअधीक्षक मोहन नाईक यांनी दिली. जयेश हा कुवेतमध्ये कामाला होता. वर्षभरापूर्वी तो गोव्यात आला होता, अशी माहिती नाईक यांनी दिली. पती-पत्नी मध्ये गेली अनेक वर्षे भांडणे होत होती. जियाने याबाबत महिला पोलीस विभागाकडेही तक्रारी केल्या होत्या. तीन दिवसांपूर्वी जयेश आपल्याला त्रास करत असल्याची तक्रार जियाने पोलिसांत केली होती.
जयेश व जियाला दोन मुले असून सकाळी त्यांना बाळ्ळी येथील शाळेत पोहोचविल्यानंतर जयेश रागाच्या भरातच घरात आला होता. घरात शिरल्यानंतर त्याने मुख्य दरवाजाला आतून कडी घातली व जियाशी भांडण उकरून काढले. दोघांचाही वाद शिगेला पोहोचला होता. शेजाऱ्यांना दोघांचे भांडण ऐकू येत होते. मात्र, नेहमीच या दाम्पत्यांमध्ये भांडणे होत असल्याने सुरुवातीला शेजाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. मात्र, काही वेळाने जियाच्या किंकाळ्या ऐकू येऊ लागल्यानंतर शेजारी घरासमोर जमले.
शेजाऱ्यांनी जयेश जियावर चाकूने वार करत असल्याचे बघून त्वरित कुंकळ्ळी पोलीस ठाण्यात माहिती दिली. उपनिरीक्षक तुकाराम चव्हाण हे तातडीने घटनास्थळी दाखल होत असतानाच, जयेश दुचाकीवरून पळून गेल्याचे स्थानिकांनी चव्हाण यांना सांगितले. चव्हाण यांनी जयेशचा पाठलाग करण्यासही सुरुवात केली. मात्र, त्यांना चकवा देत जयेशने धूम ठोकली. पोलिसांनी बेतुल, काब द राम, खणगिणी, खोल, तसेच आगोंद भाग पिंजून काढला. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत तो सापडू शकला नाही.
जियाच्या मानेवर, पोटावर तसेच पायावर वार केले होते. जखमी जियाला पोलिसांनी बाळ्ळी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनास्थळी तीन चाकू सापडले असून ते जप्त करण्यात आले. (प्रतिनिधी)