लोकांच्या सूचना विचारात घेणार; मुख्यमंत्री सावंत आणि मंत्री राणे यांच्यात झोनिंग प्लॅनबाबत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 03:37 PM2023-10-06T15:37:14+5:302023-10-06T15:39:58+5:30

मुख्यमंत्र्यांनी प्रथमच पेडणे झोनिंग प्लॅनविषयी भाष्य केले.

will consider public suggestions discussion between cm pramod sawant and vishwajit rane regarding pedne zoning plan | लोकांच्या सूचना विचारात घेणार; मुख्यमंत्री सावंत आणि मंत्री राणे यांच्यात झोनिंग प्लॅनबाबत चर्चा

लोकांच्या सूचना विचारात घेणार; मुख्यमंत्री सावंत आणि मंत्री राणे यांच्यात झोनिंग प्लॅनबाबत चर्चा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पेडणे तालुक्याच्या झोनिंग प्लॅनबाबत नागरिकांच्या ज्या काही सूचना व आक्षेप आहेत, त्या विचारात घेतल्या जातील. सगळी प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने केली जाईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल येथे जाहीर केले. मी टीसीपी खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांच्याशीही काल बोललो व सगळीकडे झोनिंग प्लॅन मसुदा लोकांसाठी उपलब्ध करा, अशी सूचना टीसीपी खात्याला केल्या आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी प्रथमच काल पेडणे झोनिंग प्लॅनविषयी भाष्य केले. मुख्यमंत्री म्हणाले की, पेडणेतील लोकांना अंधारात ठेवले जाणार नाही. झोनिंग प्लॅन मसुद्यात जे काही नमूद करण्यात आले आहे किंवा ज्या काही तरतुदी केल्या आहेत, त्या सर्व लोकांना कळाव्यात म्हणून प्रत्येक पंचायत कार्यालयासह टीसीपी कार्यालय तसेच पेडणेतील अन्य सर्व सरकारी कार्यालयांत मसुदा खुला ठेवा, अशी सूचना मी केली आहे. पारदर्शक पद्धत स्वीकारा व त्यासाठी मसुद्याच्या प्रती सगळीकडे खुल्या ठेवा. सगळीकडे लोकांना तो मसुदा पहायला मिळू दे व मग सूचना आणि आक्षेप लोकांनी करू द्या. लोकांचा तो अधिकार आहे.

पारदर्शक पद्धत : मंत्री विश्वजित राणे

दरम्यान, मंत्री विश्वजित राणे म्हणाले की, पेडणेत विमानतळ वगैरे आला. रस्ते रुंदीकरण किंवा अन्य तरतुदी करताना सर्वांनाच सूचना करण्याची संधी सरकारने दिली आहे. प्रथमच घरे वगैरे झोनिंग प्लॅनमध्ये दाखवली गेली. मसुदा मी तयार केलेला नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सल्लागारांना घेऊन मसुदा तयार झाला आहे. पेडणेच्या विकासासाठी हे केले आहे. आम्ही मसुदा खुला ठेवलाच आहे. लोकांच्या सूचनांवर तज्ज्ञ अधिकारी व सल्लागार विचार करतील. मी मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली आहे.

लोकांना भेटणार

पेडणेतील लोकांनी तसेच मांद्रेच्या आमदारांनी माझ्याकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. मी वेळ दिली आहे. मी आज लोकांना भेटून त्यांचे म्हणणे काय आहे, ते ऐकून घेईन. माझी विश्वजित यांच्याशीही चर्चा झाली आहे. लोकांच्या सूचना व आक्षेप आले की, त्यानुसार मसुद्यात बदल केले जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

 

Web Title: will consider public suggestions discussion between cm pramod sawant and vishwajit rane regarding pedne zoning plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.