लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : मागील विधानसभा निवडणुकीत मतदारांनी खरे म्हणजे मलाच कौल दिला होता. कसा पराभव घडवून आणला गेला, हे सर्वांनाच माहीत आहे. पराभवाने खचून जाणारा मी नाही. माझा आजही तेवढाच जनसंपर्क आहे. लोकांची कामे करणे मी थांबवलेले नाही. आजही सर्वसामान्यांच्या उद्धारासाठी काम सुरूच आहे. लोकांची इच्छा असेल, तर पुन्हा एकदा प्रियोळ मतदारसंघातून लढणारच आहे. गरज पडल्यास मगोसाठी तालुक्यातील कोणत्याही एका मतदारसंघावर माझा दावा नक्की असेल, असे उद्गार मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी काढले.
नोकरभरतीसंदर्भात ते म्हणाले की, जे काही होत आहे ते एकदम चुकीचे आहे. नोकऱ्या ह्या योग्य व पात्र उमेदवारांना मिळायला हव्यात. मात्र, ज्यांच्याकडे पैसे आहेत, ते जर पैसे देऊन नोकरी घेऊ लागले, तर गोरगरीब व होतकरू मुलांवर अन्याय होऊ शकतो. काही व्यक्ती लोकांच्या असाहाय्यतेचा फायदा घेत त्यांना फसवत आहेत. या संदर्भात मगो पक्षाच्या आगामी केंद्रीय समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात येईल.
आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर जे काम केले आहे, त्यावर आम्ही समाधानी आहोत. चौकशीत दोषी आढळल्यास ते कोणालाच सोडणार नाहीत, यावर आमचा विश्वास आहे. तरीसुद्धा आमच्या काही सूचना आम्ही निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना नक्की देऊ, असेही ते शेवटी म्हणाले.
युतीचा धर्म पाळू...
सरकारमध्ये आम्ही मुख्य घटक असल्याने युतीचा धर्म पाळू, आमच्या संबंधाला कुठेही गालबोट लागणार नाही, याची काळजी घेऊ. फोंडा मतदारसंघ हा 'मगो'चा बालेकिल्ला असल्याने त्या मतदारसंघावर आमचा दावा कायम राहील. तालुक्यातील चारही मतदारसंघांत आमचे जोमाने काम सुरू आहे, असेही ते पुढे म्हणाले.