पणजी - राज्यातील खनिज खाणींच्या बंदी प्रश्नावर 13 फेब्रुवारीपर्यंत तोडगा निघणार नाही, कारण संसदेत विधेयक सादर करण्यासाठी आता दिवस खूप कमी आहेत, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. सरचिटणीस सदानंद शेट तानावडे व केशव प्रभू यांच्या उपस्थितीत बोलताना तेंडुलकर म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील खाणप्रश्नात लक्ष घालण्याची ग्वाही दिली आहे. ते निश्चितच गोव्याविषयी योग्य ती भूमिका घेतील. मोदी यांना गोव्याचा खाणप्रश्न कळाला आहे.
13 फेब्रुवारीपर्यंत जर तोडगा निघाला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा खाण अवलंबितांच्यावतीने पुती गावकर यांनी दिला असल्याविषयी विचारताच तेंडुलकर म्हणाले, की संसदेचे काम विरोधकांनी होऊ दिले नाही व त्यामुळे सरकारला विधेयक मांडता आलेले नाही. 13 फेब्रुवारीपर्यंत विधेयक वगैरे सादर होणे शक्य नाही. कारण वेळ कमी आहे. 13 नंतरच्या काळात तोडगा निघू शकतो. पंतप्रधानांनी तोडगा काढण्यासाठी ठराविक कालावधीची मर्यादा निश्चित केलेली नाही. ते तसे काही बोलले नाहीत पण गोव्याच्या खाण विषयात लक्ष घालीन, मी तो विषय पाहतो असे पंतप्रधान म्हणाले आहेत.
मगोपशी लवकरच चर्चा
दरम्यान, मगो पक्षाविषयी बोलताना तेंडुलकर म्हणाले, की अजून काही पोटनिवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. शिरोडा व मांद्रेमध्ये आपण उमेदवार उभे करणार असे जरी मगो पक्ष म्हणत असला तरी, प्रत्यक्ष पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर व उमेदवारी अर्ज सादर करून तो मागे घेण्यासाठीची मुदत संपल्यानंतरच खरी गोष्ट कळून येईल. मगो पक्षासोबत आमचे चांगले संबंध आहेत. कारण तो पक्ष सत्ताधारी आघाडीत आहे. आम्ही मगोपशी चर्चा करून योग्य तो तोडगा काढू. येत्या 14 किंवा 15 रोजी किंवा त्यानंतर मगोपशी आमची चर्चा होईल.