राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ठरणार 'वर्ल्ड रिकोर्ड', पंतप्रधान मोदींच्याहस्ते २६ रोजी उद्घाटन- मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By समीर नाईक | Published: October 6, 2023 04:47 PM2023-10-06T16:47:39+5:302023-10-06T16:54:44+5:30
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरी येथील मंत्रालयात विशेष पत्रकार परिषद घेतली.
पणजी: राज्यात ३७ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार आहे, या स्पर्धेची तयारी पुर्णत्वाकडे आली असून, आम्ही स्पर्धेच्या आयोजनासाठी पूर्णपणे सज्ज झालो आहोत. २६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान स्पर्धा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत २६ रोजी मडगाव येथील फातोर्डा मैदानावर सायंकाळी ६.३० वा या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरी येथील मंत्रालयात विशेष पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत क्रीडामंत्री गोविंद गावडे, भारतीय ऑलिंम्पिक संघटनेचे तांत्रिक कमिटीचे प्रमुख अमिताभ शर्मा, व क्रीडा सचिव स्वेतीका सचेन उपस्थित होते.
या स्पर्धेत २८ राज्य आणि ८ केंद्र शासीत प्रदेशचे खेळाडू, अधिकारी सहभागी होणार आहेत. अधिकृत उद्घाटन २६ रोजी होत असले तरी काही सामने १९ तारखेपासून सुरु होणार आहे, जेणेकरुन स्पर्धा वेळेत संपू शकेल. यापूर्वी या स्पर्धेचे लोगो, मास्कोट, थीम साँग आणि वेबसाईट लाँचचा कार्यक्रम भव्य स्वरुपात पार पडला आहे. आतापर्यंत बऱ्यापैकी साधनसुविधा तयार झाल्या आहेत. जुन्या सुविधांमध्येच ही स्पर्धा खेळविण्यात येणार आहे, काही खेळांसाठी तात्पुर्ती सुविधा उभारण्यात येणार आहे. या सर्व सुविधा भविष्यातही उपयोगात येणार आहे, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.
स्पर्धा ठरणार 'वर्ल्ड रिकोर्ड'
आतापर्यंत ३६ राष्ट्रीय स्पर्धा झाल्या आहेत, परंतुु राज्यात होणारी ३७ वी राष्ट्रीय स्पर्धा सर्वात मोठी स्पर्धा होणार आहे. राज्यात एकूण २८ ठिकाणी ही स्पर्धा होणार असून सुमारे ४३ क्रीडा प्रकार यात असणार आहेत. देशभरातील एकूण १०,८०६ क्रीडापटू यात सहभागी होणार आहे. यातील ४९ टक्के या महिला खेळाडू असणार आहे. तर सुमारे ४७४० तांत्रिक अधिकारी येणार आहेत. आतापर्यंत ३६ क्रीडा प्रकारापेक्षा जास्त क्रीडा प्रकार कुठल्याच स्पर्धेत झालेले नाही, तसेच १० हजार पेक्षा जास्त आणि त्यात ४९ टक्के महिला खेळाडूंचा सहभाग असेही पहिल्यांदाज होत आहे, त्यामुळे ही स्पर्धा 'वर्ल्ड रिकोर्ड' ठरणार आहे, असे डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.
दहा ठिकाणी उद्घाटनचे लाईव्ह स्क्रनिंग
मडगाव येथील पं. जवाहरलाल नेहरु स्टेडीयम येथे स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. सुमारे १२ हजार प्रेक्षकांच्या क्षमतेचे हे मैदान आहे, त्यामुळे येथे उपस्थित राहणे सर्वांना शक्य नाही, याचा विचार करता राज्यात १० विविध ठिकाणी उद्घाटनचे लाईव्ह स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने राज्यातील रविंद्र भवनचा समावेश असणार आहे. यातून अडीच लाख लोक उद्घाटन पाहु शकणार आहेत. उद्घाटनप्रसंगी लोकांना मोफत प्रवेश असणार आहे, पण गर्दी होणार असल्याने निमंत्रण पत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे, तर शालेय विद्यार्थ्यांना हातात घालायला बँड देण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. सावंत यांनी यावेळी दिली.
गोव्याची वाटचाल स्पोर्टस् टूरीझम डेस्टीशनकडे
राज्यात गेल्या वर्षात मोठ्या प्रमाणात लूसोफोनीया, फीफा महिला विश्वचषक, जागतिक रँकिंग टेबलटेनिस स्पर्धा, सेपक टॅकरो विश्वचषक स्पर्धा या सारखे अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धेंचे आयोजन झाले आहे. तसेच आता आर्यनमॅन, जागतिक बीच व्हॉलीबॉल स्पर्धा होणर आहे. यातून राज्याकडे क्रीडा हब म्हणून पाहीले जाते, तसेच यातून पर्यटनाला देखील वाव मिळत आहे. त्यामुळे गोव्याची वाटचाल स्पोर्टस् टूरीझम डेस्टीशनकडे होत आहे, यात शंका नाही, असे डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.
खेळाडूंनी या संधीचे सोने करावे: क्रीडामंत्री गोविंद गावडे
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजक असल्याने प्रत्येक क्रीडा प्रकारात गोव्यातील खेळाडूंना खेळण्याची संधी मिळणार आहे. या संधीचा गोमंतकीय खेळाडूंनी करुन घेत गोव्याला पदके मिळवून द्यावीत. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून आपले कौशल्य विकसीत करण्याची चांगली संधी खेळाडूंना आहे. क्रीडा संघटनेंची समस्या आम्ही सोडवीली आहेेत, त्यामुळे त्यांनी खेळाडूंना प्रशिक्षित करण्यावर जास्त भर द्यावे, असे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.