नारायण गावस
पणजी: महसुलासाठी तसेच पर्यटनच्या नावाखाली सनबर्न सारखे महाेत्सव गाेव्यात करुन राज्याची बदनामी केली जात आहे. अशा महोत्सवांना सरकारने परवानगी देता कामा नये, अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेसचे उत्तर गोवा अध्यक्ष विजय भिके यांनी पत्रकार परिषदेत केली.
विजय भिके म्हणाले, सनबर्नच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा व्यावसाय होत असतो. पण ते जनतेसमोर आणले जात नाही. अशा या महोत्सवामुळे नवीन पिढी ड्रग्जच्या आहारी जाते. सनबर्न ही आमची संस्कृती नाही तरीही सरकार आयोजकांकडून माेठ्या प्रमाणात पैस घेत अशा महोत्सवांना परवानगी देत असते. सरकारला जनतेचे काहीच पडलेले नाही. तसेच या महोत्सवासाठी सरकारची सर्व यंत्रणा व पाेलीस सुरक्षा पुरविली जात आहे हे चुकीचे आहे.
राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात चोऱ्या दराेडे, खून बलात्कार सारख्या घटना घडत आहेत. यासाठी पोलिसांची कमतरता भासते पण सनबर्न सारख्या महोत्सवांना पोलीस सुरक्षा पुरविली जात आहे. जनतेच्या पैशाचा वापर केला जात आहे. हा सनबर्न पारदर्शक आहे तर या महोत्सवात पत्रकारांना का आत घेतले जात नाही? तसेच सर्वत्र अंगरक्षक का ठेवले जातात? हा सर्व व्यावहार ड्रग्जसाठी हाेत आहे. करोडो रुपयांचे ड्रग्ज येथे विकले जातात. हे सरकारलाही माहिती आहे. पण काही पैशासाठी तसेच पर्यटनाच्या नावासाठी त्यांना परवानगी दिली जाते.
सनबर्न आयोजक स्थानिक आमदार पंचायतीची परवानगी घेत नाही. तसेच सरकारच्या परवानगीची त्यांना गरज नाही. आपल्याला हवे तसे ते निर्णय घेतात. तरीही सरकार त्यांचे काहीच करु शकत नाही. कारण काही मंत्र्यांना त्यांच्याकडून पैसे पुरविले जातात, असा आरोपही विजय भिके यांनी केला.