विदेशातील गोमंतकीयांच्या येथील जमिनी सुरक्षित राहाव्यात यासाठी कायदा दुरुस्ती येणार- विजय सरदेसाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2017 05:38 PM2017-12-03T17:38:33+5:302017-12-03T17:38:45+5:30
पणजी : विदेशात नोकरी, धंद्यानिमित्त स्थायिक असलेल्या गोमंतकीयांच्या जमिनी सुरक्षित राहाव्यात यासाठी गोवा सरकार येत्या विधानसभा अधिवेशनात कायदा दुरुस्ती आणली जाईल.
पणजी : विदेशात नोकरी, धंद्यानिमित्त स्थायिक असलेल्या गोमंतकीयांच्या जमिनी सुरक्षित राहाव्यात यासाठी गोवा सरकार येत्या विधानसभा अधिवेशनात कायदा दुरुस्ती आणली जाईल. नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी ही माहिती दिली. विदेशात असलेल्या गोवेकरांच्या जमिनी खोटी कागदपत्रे करुन किंवा अन्य गैरप्रकारे विकल्या जाण्याचे वाढते प्रकार घडत आहेत. नुकत्याच आपल्या दुबई दौ-यातही तेथील गोमंतकीयांकडून अशा तक्रारी आल्याचे ते म्हणाले.
अनेकदा पॉवर आॅफ अॅटर्नी ज्याच्याकडे दिलेली आहे ती व्यक्ती मालकाला पत्ता लागू न देता गुपचूपपणे जमीन विकून मोकळी होते. आखातात किं वा विदेशात असलेले गोमंतकीय जेव्हा गोव्यात परत येतात तेव्हा हा प्रकार उघडकीस येतो परंतु तोवर वेळ निघून गेलेली असते. हे प्रकार रोखण्यासाठी आणि जमिनी सुरक्षित ठेवण्यासाठी येत्या अधिवेशनातच विधेयक आणले जाईल.
गोवा विधानसभेचे पाच दिवसीय अधिवेशन येत्या १३ पासून सुरु होत आहे. कायदा आणून अशी सक्ती करता येईल की, जमिनी किंवा अन्य कोणतीही मालमत्ता विकताना मालक प्रत्यक्ष उपस्थित रहावा. त्यामुळे पॉवर आॅफ अॅटर्नी ज्या व्यक्तीकडे आहे ती व्यक्ती गैरफायदा घेऊ शकणार नाही. भू नोंदणी कायद्यात त्यासाठी आवश्यक ती दुरुस्ती आणली जाईल. सरदेसाई म्हणाले की, एका अंदाजानुसार केवळ संयुक्त अरब अमिरातमध्येच २ लाखांहून अधिक गोमंतकीय कामा-धंद्यानिमित्त आहेत. गोव्याची १५ लाख लोकसंख्या पाहता हा आकडाही मोठा आहे. ते गोव्याचे मतदारही आहेत. त्यांच्या अनेक समस्या त्यांनी बोलून दाखवल्या आहेत. येत्या ७ जानेवारी रोजी भारतीय प्रवासी दिनी त्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी भेट घालून देण्याचे अभिवचनही आपण दिल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.
दुबई येथे गोवा फॉरवर्डने शनिवारी कार्यालयाचे उद्घाटन केले. सरदेसाई यांच्या म्हणण्यानुसार ह्यगोवा फॉरवर्ड फॉर युएईह्ण हा पक्ष्राचा प्रत्यक्ष भाग नव्हे तेथील गोमंतकीयांना या संघटनेखाली एकत्र आणणे हाच उद्देश आहे. गोवा फॉरवर्ड भाजपबरोबर आघाडी सरकारात आहे. हे सरकार कोणतेही धोरण निश्चित करताना जनतेच्या आशा आकांक्षांचा विचार करणार आहे. अनिवासी गोमंतकीयांचाही प्राधान्यक्रमे विचार होईल. अनिवासींनी गोव्यात बिगर प्रदूषणकारी किंवा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांमध्ये गुंतवणूक करावी अशी आमची अपेक्षा आहे. आखातात किंवा अन्य ठिकाणी नोकरी, धंद्यानिमित्त असलेले गोवेकर जर परत गोव्यात येऊन स्थायिक होत असतील तर त्याला प्रोत्साहन व सर्व प्रकारचे सहकार्य दिले जाईल, असे सरदेसाई म्हणाले. दुबईपाठोपाठ कॅनडा तसेच आॅस्ट्रेलियातही जाण्याचा गोवा फॉरवर्डचा विचार आहे. दरम्यान, अलीकडेच गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश घेतलेले माजी मंत्री बाबुश मोन्सेरात यानी रविवारी सांताक्रुझ मतदारसंघात कार्यालय सुरु केले. तिसवाडी तालुक्यात आगामी विधानसभा निवडणुकीत गोवा फॉरवर्ड प्रबळ शक्ती म्हणून पुढे येईल, असा दावा सरदेसाई यांनी यावेळी केला.