गोंदिया : जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणासह अत्याधुनिक उपचार पद्धतीने उपलब्ध होण्यासाठी खा.प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या सरकारकडून गोंदिया मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव मार्गी लावला. एवढेच नाही तर केंद्राकडून त्यासाठी मोठा निधीही मंजूर करून दिला. मात्र मागील दोन वर्षापासून येथील तृट्या दूर करण्यात यश येत नसल्याने इंडियन मेडिकल कॉन्सीलने या मेडिकल कॉलेजला मंजुरी दिलेली नाही. मागील दोन वर्षात या मेडिकल कॉलेजसाठी केंद्र शासनाने दोन टप्यात १० कोटी तर राज्य शासनाने ११ कोटी रूपये दिले आहेत. मात्र केंद्राच्या निधीतून एक रुपयाही अद्याप खर्च होऊ शकलेला नाही.आघाडी सरकारने नंदूरबार, बारामती, चंद्रपूर, गोंदिया, अलीबाग, सातारा व मुंबई या ठिकाणासाठी वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले. गोंदियाच्या मेडीकल कॉलेजला २०० कोटी रूपये देण्याचे या पूर्वीच्या केंद्रसरकारमध्ये असलेल्या नेत्यांनी मंजूर करून दिले होते. मेडीकल कॉलेजला लागणारा ७५ टक्के निधी केंद्र तर २५ टक्के निधी राज्य सरकार देणार होते. परंतु आता पुन्हा नियम बदलले आहे. केंद्र ६० टक्के तर राज्य ४० टक्के निधी देण्याचे ठरले. या मेडीकल कॉलेजकरीता १८९ कोटी देण्याचे ठरले. त्यात केंद्र सरकार १४१ कोटी तर राज्यसरकार ४७ कोटी देणार असल्याचे ठरले. परंतु राज्य सरकारने दोन वर्षात ११ कोटी रूपये साहित्य खरीदेसाठी दिले. त्याचा खर्चही झाला परंतु केंद्राने पहिल्या टप्यात सहा कोटी रूपये ११ आॅगस्ट २०१५ रोजी तर ४ कोटी रूपये ६ नोव्हेंबर २०१५ रोजी महाराष्ट्र शासनाच्या वित्तविभागाला दिल्याचे पत्र मेडीकल कॉलेजच्या अधिष्ठाता यांना मिळाले. हे पैसे खर्च करण्यासाठी प्रक्रियाच झालेली नाही असे सांगण्यात आले. त्यामुळे मिळालेल्या १० कोटीतून या मेडीकल कॉलेजसाठी कवडीही खर्च करण्यात आली नाही. राज्य शासनाने सन २०१४-१५ या वर्षात २ कोटी ४ लाख फर्निचरसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळती केले. या रकमेतील अर्धे पैसे खर्च झाले आहे. उर्वरित साहित्य खरीदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आयटीआय इमारत, बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयाची इमारत व केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयाची इमारत मेडीकल कॉलीजच्या पध्दतीने बांधली जावी यासाठी एक कोटी पाच लाख रूपये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळती केले आहे. ४० लाखातून पुस्तक व इतर कामासाठी आलेत ते खर्चही झाले आहेत. उपकरणांसाठी एक कोटी ४५ लाख आलेत ते खर्चही झाले आहेत. सन २०१५-१६ या वर्षात ३ कोटी ५० लाख रूपये वैद्यकीय महाविद्यालयाला तर २ कोटी १० लाख रूपये राज्य योजनेतून डीएमआर यांच्या खात्यात वळती करण्यात आले. मागील दोन वर्षात केंद्र वा राज्य मिळून २१ कोटी रूपये देण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)
केंद्राकडून मिळालेले १० कोटी पडून
By admin | Published: January 19, 2016 3:10 AM