२५ हजार शेतकऱ्यांना १२ कोटींची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 12:46 AM2018-06-07T00:46:39+5:302018-06-07T00:46:39+5:30

मागील वर्षी खरीप हंगामात कमी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे धानपिकावर मोठ्या प्रमाणात कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला होता. परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. त्यानंतर शासनाने आमगाव व सालेकसा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

12 crores help to 25 thousand farmers | २५ हजार शेतकऱ्यांना १२ कोटींची मदत

२५ हजार शेतकऱ्यांना १२ कोटींची मदत

Next
ठळक मुद्देकीडरोगामुळे झाले होते नुकसान : पाठपुराव्याला यश

लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : मागील वर्षी खरीप हंगामात कमी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे धानपिकावर मोठ्या प्रमाणात कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला होता. परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. त्यानंतर शासनाने आमगाव व सालेकसा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
आमगाव, सालेकसा, देवरी या तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात पिकांची लागवड केली होती.सुरूवातीला या पिकांना पावसाचा व त्यानंतर कीडरोगाचा फटका बसला. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना हाती आलेले पीक गमविण्याची पाळी आली होती. कीडरोगांमुळे हाती आलेले पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांवर कर्जाचे संकट ओढवले. बँकेतून व उधार उसनवारी करुन शेतकऱ्यांनी खरीपात पिकांची लागवड केली होती. मात्र कमी पाऊस आणि कीडरोगांच्या प्रादुर्भावामुळे यावर पाणी फेरल्या गेले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. कीडरोगांमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. याचीच दखल आ. सजंय पुराम यांनी या दोन्ही तालुक्यातील कीडरोगांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर केला. शेतकऱ्यांना नुकसान भरापाई मिळावी, यासाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला. त्याचीच दखल घेत शासनाने या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी १२ कोटी १० लाख ५९ हजार २२६ रूपयांचा निधी मंजूर केला. याचा लाभ आमगाव तालुक्यातील १४ हजार ४३ शेतकऱ्यांना तर सालेकसा तालुक्यातील ११ हजार ४८९ शेतकऱ्यांना मिळणार आहे. नुकसान भरपाईपोटी मंजुर झालेल्या निधी तहसील कार्यालयातंर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला जाणार आहे. हंगामाला सुरूवात झाली असून नुकसान भरपाईच्या रक्कमेचे वाटप लवकर होणार का याकडे लक्ष आहे.
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी
कमी पाऊस आणि कीडरोगांच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी. यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. शासनाने सुध्दा याची दखल घेत १२ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचे आ.संजय पुराम यांनी सांगितले.

Web Title: 12 crores help to 25 thousand farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.