गाेंदिया : कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील एकूण ८,४२८ फ्रंट लाईन कोरोना योद्धा यांना लसीकरण करण्यात येत येणार आहे. १६ जानेवारीपासून कोविड लसीकरणाला सुरुवात झाली. सध्या एकूण तीन लसीकरण केंद्रावरुन लसीकरण केले जात आहे. पहिल्याच दिवशी ३०० फ्रंट लाईन कोरोना योद्धा यांना लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. पण पहिल्या दिवशी २१३ जणांना लसीकरण करण्यात आले तर, ८७ जण अनुपस्थित होते. त्यामुळे पहिल्याच दिवशी १३ टक्के डोेज वाया गेले.
जिल्ह्यात फ्रंट लाईन कोरोना योद्धा यांना लसीकरण करण्यासाठी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय, तिरोडा उपजिल्हा रुग्णालय आणि देवरी ग्रामीण रुग्णालय हे तीन केंद्र निश्चित करण्यात आले. या केंद्रावर शनिवार, मंगळवार आणि बुधवार या तीन दिवशी लसीकरण करण्यात येणार आहे. याअंतर्गत आतापर्यंत एकूण ५८० फ्रंट लाईन योद्धा यांना लसीकरण करण्यात आले आहे, तर ३२० कर्मचारी लसीकरणासाठी अनुपस्थित होते. लसीच्या एका बॉटलीतून दहा जणांना लस दिली जाते. त्यामुळे लसीकरणासाठी कर्मचारी वेळेत उपस्थित राहिले नाही तर ही लस वाया जाते. १० टक्क्यापर्यंत लस वाया जाणे गृहित, मात्र त्यापेक्षा वाया जास्त असल्यास ती बाब गंभीर समजली जाते. त्यामुळे लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना संदेश मिळाल्यानंतर त्यांनी त्या वेळेत उपस्थित राहिल्यास डोज वाया जाणार नाही.
...........
एका बॉटलीत १० डोस
लसीच्या एका बॉटलमधून १० जणांना डोज देण्यात येतो. ही बॉटल काढल्यानंतर ती चार तासात वापरणे आवश्यक आहे. तसेच डोज भरतानासुद्धा काही प्रमाणात डोज वाया जाण्याची शक्यता असते. साधारणत: १० टक्के डोज वाया जातात.
...............
जिल्ह्याला मिळालेले एकूण डोज : १० हजार
वाया गेलेले डोज : ५७
जिल्ह्यात पहिल्याच दिवशी दिले डोज : २१३
किती जण अनुपस्थित : ८७
..................
घाबरू नका....
- कोरोनाची लस घेतल्यानंतर काही जणांना अंग दुखणे, डोके दुखणे, खाज सुटणे, उलटी किंवा मळमळ होणे असा त्रास होतो. मात्र यामुळे घाबरण्याचे काहीच कारण नाही. लसीकरणानंतर काही त्रास वाटल्यास लगेच जवळच्या रुग्णालयात जाऊन त्याचे निरसन करून घ्यावे.
- जिल्ह्यात आतापर्यंत ५८० जणांना लसीकरण करण्यात आले आहे. मात्र आतापर्यंत यामुळे कुणालाही त्रास झालेला नाही. कोरोनावरील लस पूर्णपणे सुरक्षित असून, ती सर्वांनी नि:संकोचपणे घ्यावी. यामुळे घाबरण्याची कुठलीही गरज नाही, असे डॉ. संजय पाचाळ यांनी सांगितले.
....