नोकरीच्या नावावर घातला १३ लाखांनी गंडा
By admin | Published: January 14, 2016 02:21 AM2016-01-14T02:21:25+5:302016-01-14T02:21:25+5:30
नवसंजीवनी योजनेत लिपीक पदावर नोकरी लावून देण्याच्या नावावर चार जणांनी येथील चार बेरोजगारांना १२ लाख ४० हजार रुपयांनी गंडा घातला.
चौघांवर गुन्हा दाखल : गंडवणाऱ्यात नागपुरातील लोक
गोंदिया : नवसंजीवनी योजनेत लिपीक पदावर नोकरी लावून देण्याच्या नावावर चार जणांनी येथील चार बेरोजगारांना १२ लाख ४० हजार रुपयांनी गंडा घातला. हा प्रकार २२ नोव्हेंबर २०१४ ते १२ जानेवारी २०१६ या काळात घडला. त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस सूत्रानुसार, आरोपी सुरेश श्रावण कोसरकर (४८) रा.छोटा गोंदिया, प्रिया सायलवार (३५) रा.स्नेहा नगर मानकापूर, नागपूर, प्रफुल प्रभाकर आटकेवार (३२) रा. नागपूर व मनीष कवाडे (३५) रा. विजय टॉकीज घाट रोड नागपूर अशी आरोपींची नावे आहेत. या चौघांनी नागपूरच्या सुभाष बगिच्यात चौघांकडून पैसे घेतले. त्यात रतनारा येथील जयराम सिताराम लिल्हारे यांच्याकडून ३ लाख ४० हजार रुपये तर अशोक पाऊलझगडे, प्रमोद साखरे व सतीश पुस्तोडे या तिघांकडून ८ लाख ९० हजार रुपये असे एकूण १२ लाख ४० हजार रुपये घेऊन खोटे नियुक्तीपत्र दिले.
सदर आरोपींवर गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ४१९, ४२०, ४६८, ४७१, ११९ (ब) ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
महिलेचा विनयभंग
गोंदिया : सालेकसा तालुक्याच्या साखरीटोला येथील सचिन उमेश गजभिये (३५) याने सोमवारी रात्री १.३० वाजता गावातीलच २८ वर्षाच्या महिलेच्या घरी जाऊन तिचा विनयभंग केला. सदर घटनेसंदर्भात सालेकसा पोलिसांनी भादंविच्या कलम ३५४, ४५१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)