गोंदिया : थकीत वाहतूक भाडे तसेच धानाच्या भरडाईचे दर निश्चित करण्याच्या मागणीला घेऊन राईस मिलर्सने भरडाईसाठी धानाची उचल करण्यास नकार दिला आहे. परिणामी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने ७० शासकीय धान खरेदी केंद्रांच्या माध्यमातून खरेदी केलेले १४ लाख क्विंटल धान जिल्ह्यातील विविध केंद्रांवर तसेच पडून आहे. यावर तोडगा न निघाल्यास धान खरेदीची प्रक्रिया ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून हमीभावाने धान खरेदी केले जाते. यंदा धानाला १८८८ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव आणि प्रतिक्विंटल ७०० रुपये बोनस जाहीर केला आहे. त्यामुळे शासकीय धान खरेदी केंद्रांवर धानाची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. नोव्हेंबर ते २० जानेवारी या कालावधीत एकूण १४ लाख ३५५ क्विंटल धान खरेदी करण्यात आले आहे. एकूण ५२ हजार शेतकऱ्यांनी आतापर्यंत धानाची विक्री केली आहे. खरेदी करण्यात आलेल्या धानाची किंमत २६२ कोटी रुपये असून, यापैकी १३३ काेटी रुपयांच्या धानाचे चुकारे करण्यात आले आहेत, तर १२८ कोटी रुपयांच्या धानाचे चुकारे अद्यापही शिल्लक आहेत. येत्या आठ-दहा दिवसांत संपूर्ण चुकारे करण्यात येणार असल्याचे मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
......
केंद्रांवरील धानाने वाढविली चिंता
शासकीय धान खरेदी केंद्रांवर खरेदी करण्यात आलेल्या धानाची राईस मिलर्सशी करार करून भरडाई करून शासनाकडे तांदूळ जमा केला जातो. त्यामुळे राईस मिलर्स खरेदीला सुरुवात झाल्यानंतर धानाची उचल करण्यास सुरुवात करतात; पण शासनाने यंदा अद्यापही धानाच्या भरडाईचे दर निश्चित केले नाही. शिवाय धानाच्या वाहतुकीच्या भाड्याची रक्कम मागील तीन वर्षांपासून दिली नाही. त्यामुळे विदर्भ राईस मिलर्स असोसिएशनने शासकीय धानाची भरडाई न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वच धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाचा खच पडला असल्याने फेडरेशनची चिंता वाढली आहे.
......
तोडगा न निघाल्याने गोदामे भाड्याने घेण्याची प्रक्रिया
शासनाने राईस मिलर्सने घेतलेल्या भूमिकेवर अद्यापही कुठलाही तोडगा काढलेला नाही. त्यामुळे राईस मिलर्स आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मात्र, यामुळे धान खरेदीची प्रक्रिया खंडित होऊ नये यासाठी आता फेडरेशनने गोदाम भाड्याने घेण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती आहे.
.......
३५ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट
मागील वर्षी खरीप हंगामात फेडरेशनने ३५ लाख क्विंटल धान खरेदी केले होते. त्याच अंदाजनुसार यंदाही ३५ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट ठेवले असून यासाठी २४० गोदामांचे नियोजन करण्यात आले होते.