गोंदिया : येथील १७ वर्षांची अल्पवयीन मुलगी इन्स्टाग्राम ॲपवर मित्रासोबत नेहमी चॅटिंग करीत असल्याने तिचे वडील तिला रागावले. त्यामुळे ती २३ जून रोजी पहाटे घरी कोणाला काहीही न सांगता निघून गेली होती. तिला गोंदिया पोलिसांनी मध्य प्रदेशच्या खांडवा येथून आणून पालकांच्या स्वाधीन केले.ती घरून निघून गेल्यावर तिचा नातेवाईकांकडे व सोबत शिकत असलेले मित्र-मैत्रिणींकडे शोध घेऊन सुद्धा ती मिळून आली नाही.
परिणामी, रामनगर पोलिसात भादंविच्या कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे यांनी बेपत्ता मुलगी ही अल्पवयीन असल्याने मुलीचा युद्ध पातळीवर शोध घेण्याबाबत निर्देश दिले होते. यानुसार जिल्हा पोलिस दलाकडून मुलीचे शोधाकार्य युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येऊन तिचा शोध घेण्यात येत होता.
१ जून रोजी बेपत्ता अल्पवयीन मुलगी ही खंडवा (मध्य प्रदेश) येथे रेल्वेस्टेशनवर चाईल्ड हेल्पलाईन, यांच्याकडे मिळून आल्याची सूचना रामनगर पोलिसांना मिळताच मुलीचे वडील आणि रामनगर पोलिस पथक खंडवा येथे रवाना करण्यात आले. मुलीला ३ जून २०२३ रोजी रामनगर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. अल्पवयीन मुलीला घरून कोणाला काहीही न सांगता निघून गेल्याबद्दल विचारले असता, तिने इन्स्टाग्राम ॲपचा वापर करीत असल्याने वडिलांनी तिला रागावल्याने रागाचे भरात स्वतःच घरून निघून मथुरा गेल्याचे व प्रवास दरम्यान रेल्वे पोलिसांना मिळाल्याचे सांगितले. ३ जून २०२३ रोजी तिला गोंदियाला परत आणल्यानंतर मुलीची सविस्तर चौकशी करून परिवाराचे सुपूर्द करण्यात आले.
मुलीचे केले समुपदेशन
अल्पवयीन मुलीचे समुपदेशन करण्यात आले. यापुढे भविष्यात कोणतेही टोकाचे पाऊल उचलायचे नाही, अशी समज देण्यात आली. आई-वडील हे आपल्यासाठीच सर्व करीत असतात याची जाणीव ठेवावी, असे मार्गदर्शन करण्यात आले.