हेमराज फुंडे - कालीमाटीमाता व बालकांना जीवनदायी ठरणारी संस्था म्हणून कालीमाटी प्राथमिक आरोग्य केंद्राचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ग्रामीण भागात जनजागृती घडवून महिलांनी घरी प्रसुती न करता प्रसूती आरोग्य संस्थेतच करावी, असा आग्रह धरला. त्यामुळे मागील चार वर्षात या आरोग्य केंद्रात एकही माता मृत्यू झाला नाही. सन २०१३-१४ या वर्षाच्या सात महिन्यात १८७ गर्भवती महिलांची प्रसूती यशस्वीरीत्या करण्यात आली.ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या सर्व सोयी सुविधा उत्तमरित्या मिळाव्यात यासाठी कालीमाटी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. राजेश गेलानी, डॉ. राजेश कोहाळे, पर्यवेक्षक ईश्वर उईके, सहायीका संगीता भोंगाडे, शुभांगी दाते व डुलेश्वरी फुंडे व इतर कर्मचाऱ्यांनी या आरोग्य केंद्रात येणाऱ्या सर्व रूग्णांची देखरेख उत्तम पध्दतीने केली. या परिसरातील गर्भवती महिलांची विशेष काळजी घेऊन बालमृत्यू व माता मृत्यू होऊ दिला नाही. या आरोग्य संस्थेत सन २०१२-१३ या वर्षात २१८ प्रसुती करण्यात आल्या होत्या. या परिसरात आरोग्य संस्थेतच प्रसूती करण्याची टक्केवारी ९७ टक्के आहे. सन २०१३-१४ या चालू वर्षात जुलै अखेरपर्यंत १८७ प्रसूती करण्यात आल्या आहेत. या आरोग्य संस्थेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामामुळे मागील चार वर्षाच्या काळात डेंग्यू, मलेरिया, फायलेरिया या आजाराचा एकही रूग्ण दगावला नाही. कालीमाटी परिसरातील ३ हजार बालकांना टीबीची बीसीजी लस, पोलिओ लस, हेपेटाईटीस (बी) लस देण्यात येते. शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या सर्व मोहीमेची अमंलबजावणी करून आरोग्याविषयी जनजागृती घडवून आणण्याचा प्रयत्न या आरोग्य संस्थेकडून करण्यात येते. परिणामी या आरोग्य संस्थेने कालीमाटीची मान जिल्ह्यात उंचावल्याने पालकमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते डॉ. राजेश गेलानी यांचा सुरक्षित मातृत्व दिनानिमित्त सत्कार करण्यात आला.
आरोग्य केंद्रात सात महिन्यात १८७ प्रसूती
By admin | Published: August 26, 2014 12:02 AM