गोंदिया : मागील सन २००२ पासून नगरपरिषद दुकानांचे भाडे थकवून बसलेल्या २ भाडेकरूंच्या दुकानांना नगरपरिषदेच्या बाजार विभागाने सील ठोकले. शुक्रवारी (दि.२२) नगरपरिषदेच्या बाजार व मालमत्ता कर विभागाने संयुक्तरीत्या मोहीम राबवून ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत मालमत्ता थकबाकीदारांवर नगरपरिषदेची वक्रदृष्टी होती. आता मात्र नगरपरिषद दुकानांच्या भाडेकरूंवरही त्यांनी कारवाई सुरू केल्याने, आता त्यांचेही काही खरे नसल्याचे दिसत आहे.
राजकीय वर्चस्व व नेत्यांचा दबाव आणून शहरातील कित्येक नागरिक आपला मालमत्ता कर थकवत आले आहेत. परिणामी, नगरपरिषदेला यंदा मागील थकबाकी व चालू मागणी असे एकूण सुमारे ११ कोटी मालमत्ता वसुलीचे टार्गेट आहे, शिवाय हाच प्रकार नगरपरिषदेच्या दुकानांना भाड्यावर घेऊन चालविणाऱ्यांचा आहे. त्यांच्याकडूनही मागील कित्येक वर्षांपासून दुकानांचे भाडे भरण्यात आलेले नाही. परिणामी, नगरपरिषदेची विविध विकास कामे करताना आर्थिककोंडी होते. यंदा मात्र मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी हा प्रकार खपवून न घेण्याचे ठरवून कर वसुली पथकाला थेट कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, कधी नव्हे तो पथकाने शासकीय व खासगी कार्यालयांसह एटीएम, बँका, दुकान व मोबाइल टॉवरला सील ठोकले आहे. परिणामी, मालमत्ता कर वसुलीसाठी अथवा थकबाकीदार नगरपरिषद गाठत असताना दिसत आहे.
मात्र, दुकानांचे भाडे थकून असल्याचे लक्षात घेत, मुख्याधिकारी चव्हाण यांनी याकडे आपला मोर्चा वळविला आहे. याअंतर्गत शुक्रवारी (दि.२२) उपमुख्याधिकारी विशाल बनकर यांनी वसुली पथकाला सोबत घेत, जुन्या बाजार समितीसमोरील नगरपरिषदेच्या व्यापार संकुलमधील दुकान क्रमांक-३ व ४ ला सील ठोकले. यातील दुकान क्रमांक ३ रेणू नागेंद्रनाथ चौबे यांच्या नावावर असून, त्यांच्याकडे सन २००२ पासून भाडे व अन्य मिळून चार लाख ५० हजार ९६८ रुपयांचे भाडे थकून आहे, तर दुकान क्रमांक-४ भूवनेश्वर चौबे यांच्या नावावर असून, त्यांच्यावरही सन २००२ पासून दोन लाख ८४ हजार ५४४ रूपयांचे भाडे थकून आहे, शिवाय दुकान क्रमांक-२ साठी नागेंद्रनाथ चौबे यांना सोमवारपर्यंत मुदत देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, दुकान क्रमांक ३-४ यांना पथकाने सील ठोकले आहे. याप्रसंगी बाजार निरीक्षक मुकेश मिश्रा, अजय मिश्रा, सुधीर भैरव, प्रदीप घोडेस्वार, श्याम शेंडे, चंद्रशेखर शर्मा, समर मिश्रा व अन्य उपस्थित होते.