नगरपंचायतकडे पाणीपुरवठ्याचे ३७ लाख रुपये थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:30 AM2021-05-07T04:30:56+5:302021-05-07T04:30:56+5:30
अर्जुनी मोरगाव : नगरपंचायत प्रशासनाकडे सुजल बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्थेचे पाणीपुरवठ्याचे ३७ लाख रुपये थकीत आहेत. गेल्या सहा ...
अर्जुनी मोरगाव : नगरपंचायत प्रशासनाकडे सुजल बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्थेचे पाणीपुरवठ्याचे ३७ लाख रुपये थकीत आहेत. गेल्या सहा वर्षांपासून नगरपंचायतने भरणाच केला नसल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. नगरपंचायतच्या निद्रावस्थेमुळे शहरात जलसंकट निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
एकीकडे कोरोना तर दुसरीकडे जलसंकट निर्माण होऊ नये याची खबरदारी प्रशासनाने घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
अर्जुनी मोरगाव शहरात प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहे. पाणीपुरवठा व देखभाल दुरुस्तीचे काम सुजल सेवा समितीला देण्यात आले आहे. २०१५ मध्ये नगरपंचायत अस्तित्वात आली. तरीसुद्धा सुजल समितीमार्फतच शहरात पाणीपुरवठा सुरू होता. २०१९ मध्ये शहरातील पाणीपुरवठा योजना नगरपंचायतला हस्तांतरित करण्यात आली.
योजना हस्तांतरणानंतर ग्राहकांकडून नळ योजनेच्या पाणीपुरवठ्याची वसुली नगरपंचायतच करीत आहे. मात्र नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून सुजल समितीला त्यांनी एक पैसाही दिला नाही. समिती वारंवार पैशाची मागणी करत आहे. एप्रिल महिन्याअखेर ३७ लाख ७८ हजार २३५ रुपये थकीत आहेत. थकीत राशी द्या अन्यथा १ एप्रिलपासून पाणीपुरवठा बंद करण्याचे समितीने नगरपंचायतला लेखी पत्र दिले होते. यावर नगरपंचायतने समितीला ३१ मार्च रोजी पत्र देऊन दोन महिन्यांची मुदत मागितली आहे. अद्याप हा तिढा सुटला नाही. ३१ मे रोजी ही मुदत संपत असल्याने पाणीपुरवठा बंद होतो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.
.......
नगरपंचायतला अपयश
नगरपंचायतला ही योजना हस्तांतरित होऊन दोन वर्षे होत आहेत. मात्र पाणीपुरवठा या विषयाकडे कधीच गांभीर्याने बघितले गेले नाही. गेल्या दोन वर्षांत नळ योजनेचा विस्तार करण्याचा नगरपंचायतला विसरच पडला. एक तर शहरात जेमतेम कनेक्शन आहेत. एवढ्या कमी कनेक्शनमध्ये योजना चालविणे तारेवरची कसरत आहे. जेथे सुरळीत पाणीपुरवठा होत होता त्या सिव्हिल लाइनच्या गल्ली नं. ३ मध्ये काही भागात पाणीच पोहोचत नाही. रहिवासी वर्षभरापासून तक्रारी करत आहेत. मुख्याधिकाऱ्यांना सवडच मिळत नाही. आता या परिसरातील विहिरी आटत आहेत. नळ योजनेचेही पाणी मिळत नाही. एकीकडे कोरोनाचे तर दुसरीकडे जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. रहिवाशांनी दाद मागायची कुणीकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.