३९ मुली अजूनही बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 09:55 PM2018-12-04T21:55:26+5:302018-12-04T21:56:50+5:30
पौगंडावस्थेत मुला-मुलींची बदलणारी मानसिकता, त्यांच्या घरातील कौटुंबिक कलह, आर्थिक परिस्थीती कमकुवत, भविष्याची सुरक्षीतता पाहून आईवडीलांना त्यागून मुली परक्या मुलांसोबत पळून जातात. ही संख्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. प्रौगंडावस्थेतील ३९ मुली अजूनही बेपत्ता असल्याची नोंद जिल्हा पोलिसांकडे आहे.
नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पौगंडावस्थेत मुला-मुलींची बदलणारी मानसिकता, त्यांच्या घरातील कौटुंबिक कलह, आर्थिक परिस्थीती कमकुवत, भविष्याची सुरक्षीतता पाहून आईवडीलांना त्यागून मुली परक्या मुलांसोबत पळून जातात. ही संख्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. प्रौगंडावस्थेतील ३९ मुली अजूनही बेपत्ता असल्याची नोंद जिल्हा पोलिसांकडे आहे.
शाळा शिकताना आकर्षणाच्या नादी लागून प्रेम पाशात अडकलेल्या मुली आईवडीलांची तमा न बाळगता प्रियकरासोबत शहरात पळून जातात. आईवडील त्यांचा शोध नातेवाईक व मैत्रीणींकडे करून आपल्या माथ्यावर हात मारत नशीबालाच दोष देत बसतात. परंतु ज्या मुलांसोबत त्या मुली पळून जातात त्याच मुली महिने-दोन महिन्यांतच गेल्या पावली परतात. परंतु एकदा गेलेली मुलगी परतलीच नाही तर तिची विक्री तर झाली नाही अशी भितीही पालकांच्या मनात येते.
जन्म देणाऱ्या मात्यापित्यांच्या आशेवर पाणी फेरणारे मुले-मुली लग्न करण्याच्या इराद्याने शहरात पलायन करतात. आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत नसलेली मुले ज्या मुलीला पळवून नेतात तिला काही दिवसांतच सोडून देतात. एकदा पळून गेलेली मुलगी आईवडीलांकडे परतल्यावर तिच्यासाठी योग्य वर शोधनेही आई वडिलांना क ठीण जाते. काही तर चक्क त्या मुलींची विक्री करतात. गोंदिया जिल्हा पोलीस विभाग आॅपरेशन मुस्कान- ५ राबवित असून या आॅपरेशनमध्ये अद्याप परतून आलेल्या ३९ मुलींचा शोध घेण्यात येणार आहे.
यात तिरोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १, सालेकसा १, अर्जुनी-मोरगाव ४, रामनगर १, ग्रामीण ३, गोंदिया शहर १२, गोरेगाव ८, देवरी ४, आमगाव १, रावणवाडी २, केशोरी व दवनीवाडा प्रत्येकी एक अशा ३९ मुलींचा समावेश आहे. १ ते ३१ डिसेंबर २०१८ या महिनाभरात या मुलींचा व बेपत्ता मुलांचा शोध घेण्यात येणार आहे. मिळालेल्या मुला-मुलींना आईवडिलांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.
मुलींची परप्रांतात विक्री
राजस्थान, पंजाब व हरियाणा या प्रांतात मुलींची संख्या कमी असल्याने या प्रांतातील लोक मुलींच्या शोधात महाराष्ट्रात येतात. त्यातच गोंदिया जिल्हा मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या टोकावर असल्याने येथील आदिवासी व त्यांच्य गरीबीचा फायदा घेऊन मुलींना विकत घेण्याचा प्रयत्न करतात. यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत. गोंदिया जिल्हा पोलिसांनी तीन-चार वर्षापूर्वी अशा प्रकारचे गुन्हेही दाखल केले होते. परप्रांतातील लोकांना जिल्ह्यातील मुली सोपविणारे दलालही सक्रीय आहेत. जागरूक नागरिकांच्या सहकार्याने पुढील अनर्थ टळू शकतो. बेपत्ता झालेल्या ज्या मुली आहेत त्यांची विक्री तर करण्यात आली नाही अशी शंका येते.
या ठिकाणी राबविणार शोधमोहीम
बेपत्ता मुला-मुलींचा शोध मुलांचे आश्रमगृह, अशासकीय संस्था, रेल्वेस्थानक, बसस्थानक, रस्त्यावर भीक मागणारी मुले, कचरा गोळा करणारी मुले, धार्मिक स्थळे, रूग्णालये, हॉटेल्स, दुकाने या ठिकाणी काम करणाºया मुलांंना भेटून त्यांना अपहरण करून तर आणले नाही. किंवा ते स्वत:हून पळून आले याचा शोध आॅपरेशन मुस्कानचे पोलीस घेणार आहेत.
वयात येतांना मानसिक व शारीरिक होणारे बदल, त्यातच त्यांच्या घरातील कौटुंबिक कलह व नाजूक आर्थिक परिस्थिती यामुळे स्वत:ला कमजोर समजणारी मुलगी भविष्याची सुरक्षीतता पाहत असते. याच वेळी या मुलींना हेरले तर ती समोरच्या व्यक्तीच्या जाळ्यात अडकते. हे होऊ नये यासाठी पालकांनी घरातील वातावरण प्रफुल्लीत ठेवावे. वाट चुकणाºया मुला-मुलींना वेळीच वळणावर आणले तर पळून जाण्याचे प्रमाण निश्चीतच कमी होईल.
-डॉ.प्रदीप गुजर
बालरोग विशेषतज्ज्ञ गोंदिया.