आठ महिन्यांत रेल्वेच्या रूळांवर ४० जणांचा बळी
By Admin | Published: August 23, 2016 01:53 AM2016-08-23T01:53:04+5:302016-08-23T01:53:04+5:30
मुंबई-कोलकाता या मुख्य रेल्वे लाईनवरील गोंदिया हे महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. अपघात किंवा आत्महत्या
देवानंद शहारे ल्ल गोंदिया
मुंबई-कोलकाता या मुख्य रेल्वे लाईनवरील गोंदिया हे महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. अपघात किंवा आत्महत्या यासारख्या घटनांमध्ये गोंदिया रेल्वे पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या क्षेत्रात गेल्या ८ महिन्यात ४० जणांचा रेल्वे रूळावर बळी गेला आहे. जानेवारी ते २१ आॅगस्ट २०१६ पर्यंतच्या या बळींमध्ये १७ मृतदेहांची ओळख अजूनही पटलेली नाही. त्यामुळे त्यांचा घातपात झाला, अपघात की आत्महत्या हे कळू शकले नाही.
गोंदिया रेल्वे पोलीस ठाण्यांतर्गत नागपूरच्या दिशेने गोंदिया ते भंडारा यादरम्यान गंगाझरी, काचेवानी, तिरोडा, मुंडिकोटा, तुमसर, कोका व भंडारा ही स्थानके मोडतात. तसेच तुमसर ते गोबरवाहीपर्यंत तुमसर जंक्शनवरून मोडणाऱ्या स्थानकांचा समावेश आहे. शिवाय गोंदिया ते बालाघाट मार्गावरील गोंदिया ते काटी-बिरसोलापर्यंतच्या स्थानकांचा समावेश आहे. रायपूरच्या दिशेने गोंदिया ते गुदमा, आमगाव, सालेकसा व दर्रेकसापर्यंच्या स्थानकांचा समावेश आहे. चंद्रपूरच्या दिशेने वडेगावपर्यंतचा लोहमार्ग गोंदिया रेल्वे पोलीस ठाण्यांतर्गत मोडतो.
सदर रेल्वे क्षेत्रात यावर्षी जानेवारी ते २१ आॅगस्टपर्यंत रेल्वे रूळावर एकूण ४० जणांचा जीव गेला आहे. यापैकी २३ मृतदेहांची ओळख पटली आहे. तर तब्बल १७ मृतदेहांची अद्यापही ओळख पटलेली नसल्याचे गोंदिया रेल्वे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे गोंदिया रेल्वे पोलीस अद्यापही त्या मृतदेहांची ओळख पटविण्याच्या शोधार्थ भटकत आहेत.
दिवसेंदिवस रेल्वेरूळांवर बळी जाणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. असा एकही महिना जात नाही ज्या महिन्यात रेल्वे रूळावर बळी गेले नाहीत. जानेवारी महिन्यात एकूण सहा जणांचा रेल्वे रूळावर बळी गेला. यापैकी तीन मृतदेहांची ओळख पटली तर तीन मृतदेहांची अद्यापही ओळख पटू शकली नाही. फेब्रुवारी महिन्यात तीन जणांचा बळी गेला आणि तिघांचीही ओळख पटली. मार्च महिन्यात सहा जणांचा बळी गेला. त्यापैकी तिघांची ओळख पटली तर तिघे अनोळखीच आहेत.
एप्रिल महिन्यात चार जणांचा बळी गेला. यापैकी दोघांची ओळख झाली तर दोघे अद्याप अनोळखीच आहेत. मे महिन्यात एकूण सहा जणांचा बळी गेला. यात तीन मृतदेहांची ओळख झाली तर तीन मृतदेह अनोळखी म्हणून पुरण्यात आले. जून महिन्यात चार मृतांपैकी तिघांची ओळख पटली तर एक अनोळखी मृतदेह ठरला.
यावर्षी आतापर्यंत रेल्वे रूळावर सर्वाधिक बळी जुलै महिन्यात झाले. या महिन्यात एकूण ७ जणांचा बळी रेल्वे रूळांवर गेला. त्यापैकी तिघांची ओळख पटविण्यात गोंदिया रेल्वे पोलिसांना यश आले तर चार मृहदेह अद्यापही अनोळखीच आहेत. आॅगस्टच्या २१ तारखेपर्यंत एकूण चार बळी या रेल्वे मार्गावर झाले. त्यापैकी एका मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही.
अपघात की आत्महत्या?
४दर महिन्यात रेल्वे रूळांवर अनेकांचा बळी जात आहे. मात्र हे अपघात आहे की आत्महत्या आहेत, याबाबत गोंदिया रेल्वे पोलिसांना माहीत नाही. जर मृताजवळ एखादी चिठ्ठी मिळत असेल किंवा सुगावा लागण्याजोगे काही साहित्य सापडत असेल तरच त्या व्यक्तीने आत्महत्या केल्याचे सिद्ध होते. मात्र मृतदेहाजवळ सदर बाबी आढळल्या नाही तर त्या घटनेला अपघातच समजले जाते. मात्र आत्महत्या करणारा व्यक्ती मी आत्महत्या करीत आहे, अशी चिठ्ठी लिहीलच असेही नाही. सर्वसामान्यपणे यापैकी अधिक आत्महत्याच असण्याची शक्यता आहे. मात्र रेल्वे पोलिसांच्या दृष्टिने हे अपघातच ठरत आहेत. तसेच केवळ मृतदेहाची ओळख पटविणे एवढेच काम गोंदिया रेल्वे पोलिसांचे दिसून येते. त्यांच्याकडे यापैकी किती अपघात आहेत व किती आत्महत्या आहेत, याबाबत नोंदच नाही.