५ दिवसांत ४५९ पर्यटकांनी केली जंगल सफारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:20 AM2021-07-20T04:20:48+5:302021-07-20T04:20:48+5:30
गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे बघून बंद असलेल्या नवेगाव-नागझिरा प्रकल्पाला २६ ते ३० जूनपर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात ...
गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे बघून बंद असलेल्या नवेगाव-नागझिरा प्रकल्पाला २६ ते ३० जूनपर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. विशेष म्हणजे, या ५ दिवसांच्या कालावधीत तब्बल ४५९ पर्यटकांनी व्याघ्र प्रकल्पात हजेरी लावली असून, जंगल सफारीची आपली इच्छा पूर्ण करून घेतली आहे. यातून वन विभागालाही ७५ हजार ५० रुपयांचा महसूल मिळाला आहे.
माणूस आपल्या हव्यासापोटी जंगलांना नष्ट करून तेथेही सिमेंट काँक्रीटचे जंगल उभारत आहे. परिणामी आज मोकळा श्वास घेण्यासाठी या मानवालाच काही क्षण निवांत घालविण्यासाठी नैसर्गिक वातावरण उरलेले नाही. यामुळेच मानवाला या धकाधकीच्या जीवनात काही काळ निवांत घालविण्यासाठी निसर्ग सान्निध्याची गरज भासत आहे. यासाठी वन विभागाने राखून ठेवलेल्या जंगलांकडे त्यांची पावले आपसूकच वळत आहेत. हेच कारण आहे की, शहरी नागरिकांचा कल आता वन पर्यटनाकडे दिसत आहे.
अशात जिल्हावासीयांसाठी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प वरदान ठरत असून, येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. मात्र, मार्च महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट जोर धरू लागली व त्यामुळे व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. मात्र, जून महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने राज्य शासनाने पर्यटनासाठी परवानगी दिल्याने वन विभागाने व्याघ्र प्रकल्प उघडण्याची तयारी केली. त्यानुसार २६ ते ३० जून या ५ दिवसांसाठी नवेगाव-नागझिरा व्याघ्र पर्यटनासाठी खुले करण्यात आले होते.
आश्चर्याची बाब अशी की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे घरातच कोंडून असलेल्या नागरिकांनी ही सुवर्णसंधी मिळाली. तब्बल ४५९ पर्यटकांनी वन पर्यटनाची ही संधी साधून घेत आपला जंगल सफारीचा मोह पुरवून घेतला. यात ८७ वाहनांनी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात प्रवेश केला असून, यातून वन विभागाला ७५ हजार ५० रुपयांचा महसूल मिळाला आहे. विशेष म्हणजे, फक्त ५ दिवसांसाठी खुले करण्यात आलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात ४५९ पर्यटकांनी हजेरी लावल्याने वन पर्यटनासाठी नागरिक किती आतुर आहेत याची प्रचीती येते.
--------------------------------
चोरखमारा गेटलाच पसंती
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना प्रवेश करता यावा यासाठी ६ गेट देण्यात आले आहेत. मात्र, यातील चोरखमारा गेटलाच पर्यटकांची पसंती असल्याचे दिसते. कारण, या ५ दिवसांच्या कालावधीत चोरखमारा गेट-१ येथून २२१ पर्यटकांनी ४२ वाहनांनी प्रवेश केला आहे, तर चोरखमारा गेट-२ येथून ४१ पर्यटकांनी ७ वाहनांनी प्रवेश केला आहे. पिटेझरी गेट येथून १२६ पर्यटकांनी २३ वाहनांनी, मंगेझरी गेट येथून ३८ पर्यटकांनी ८ वाहनांनी, खोली गेट येथून ३१ पर्यटकांनी ६ वाहनांनी, तर कोका गेट येथून २ पर्यटकांनी १ वाहनाने व्याघ्र प्रकल्पात प्रवेश केला आहे.
----------------------------------------
प्रवेशद्वाराचे नाव पर्यटक संख्या वाहन संख्या प्राप्त महसूल
चोरखमारा गेट- १ २२१ ४२ ३६६००
चोरखमारा गेट- २ ४१ ०७ ६१५०
पिटेझरी १२६ २३ २०८००
मंगेझरी ३८ ०८ ६२००
खोली ३१ ०६ ४८००
कोका ०२ ०१ ५००
एकूण ४५९ ८७ ७५०५०