आॅनलाईन लोकमतगोंदिया : येथील सांस्कृतिक नाट्यगृहाच्या बांधकामात असलेली निधीची अडचण आता दूर झाली आहे. आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या मध्यस्थीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाट्यगृहासाठी ५ कोटींचा निधी सप्लिमेंट्री बजेटमधून दिला आहे. त्यामुळे येत्या एक वर्षात नाट्यगृहाचे बांधकाम पूर्ण होणार असल्याचे दिसते.आमदार अग्रवाल यांची शहरात नाट्यगृह तयार करण्याची संकल्पना होती व त्यानुसार त्यांनी सन २०११ मध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून नाट्यगृह मंजूर करवून घेतले होते. या नाट्यगृहाच्या बांधकामाचे भूमिपूजनही माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. एकूण १० कोटींच्या या नाट्यगृहासाठी सन २०११-१२ मध्ये नगर परिषदेला १.५० कोटी व २०१४-१५ मध्ये २.५५ कोटी शासनाने दिले आहेत. तर नगर परिषदेने लोकवर्गणीचे १ कोटी दिले आहे. उरलेल्या ५ कोटींच्या निधीमुळे नाट्यगृहाच्या बांधकामाची गती मंदावली होती.यावर नगराध्यक्ष अशोक इंगळे व मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी २९ नोव्हेंबर रोजी आमदार अग्रवाल यांची भेट घेऊन त्यांना उरलेला निधी शासनाकडून मिळवून देण्याची मागणी करीत तसे निवेदन दिले होते. यावर आमदार अग्रवाल यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन नाट्यगृहाच्या बांधकामाची स्थिती सांगत ५ कोटींचा निधी मिळाल्यास वर्षभरात नाट्यगृहाचे बांधकाम पूर्ण होणार असल्याचे सांगीतले. आमदार अग्रवाल यांच्या विषयाला लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी संबंधीत विभागाला सप्लीमेंट्री बजटमध्ये नाट्यगृहासाठी ५ कोटींचा निधी देण्याचे निर्देश दिले. हा निधी मिळाल्याने नाट्यगृहाच्या बांधकामाला गती मिळणार आहे.
नाट्यगृहासाठी ५ कोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 9:47 PM
येथील सांस्कृतिक नाट्यगृहाच्या बांधकामात असलेली निधीची अडचण आता दूर झाली आहे.
ठळक मुद्देआमदार अग्रवाल यांची मध्यस्थी : सप्लिमेंट्री बजेटमधून मिळाला निधी