शासनाचा अजब फतवा : आसोलीच्या २५ शेतकऱ्यांचा आक्रोश आमगाव : आसोली येथील तलाठी साझा क्रं. १७ मधील २५ शेतकऱ्यांची जवळपास ७० एकर शेती उपजिल्हाधिकारी गोंदिया यांच्या आदेशान्वये सातबारामधून गायब झाल्याने बाधित शेतकऱ्यांमध्ये व्यापक रोष निर्माण झाला आहे. आसोली येथील ७० एकर शेतजमीन आसोली लघू प्रकल्पाला देण्यात आली. जेव्हा शेतकरी आपले धान विकण्यासाठी सातबारा घेण्याकरिता गेले, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. जवळपास २० वर्षांपासून आसोली प्रकल्पाकरिता शासनाच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे परिसरातील शेती विक्रीवर बंदी आहे. तलाठी मेश्राम यांच्याकडे गेंदलाल दुलीचंद भगत हे सातबारा घेण्याकरिता गेले असता उपजिल्हाधिकारी यांचे आदेश असल्याने तुमची आवश्यकता नाही, असे उत्तर मेश्राम यांनी दिले. गेंदलाल भगत यांची जवळपास १० एकर शेती धरणात जात आहे.शेतकऱ्यांना कसलीही सूचना किंवा नोटीस देण्यात आले नाही. फेरफार पंजीवरसुध्दा सही घेणयात आली नाही. या २५ शेतकऱ्यांकडे आसोली प्रकल्पात शेती गेल्यानंतर शेती शिल्लक राहणार नाही. सदर शेतकरी गेंदलाल भगत हे तहसीलदार राजीव शक्करवार यांच्याकडे जाऊन सातबारा पाहिजे, अशी मागणी केली. तेव्हा तहसीलदार यांनी आम्ही सातबारा देऊ शकत नाही. तुमची जमीन लघू पाटबंधारे विभागाच्या नावे करण्यात आली, असे उत्तर मिळाले. यात गेंदलाल भगत, नारायण डोहरे, रतिराम डोहरे, सदाराम कथलेवार, भागवत भगत व अन्य शेतकरी मिळून २५ शेतकऱ्यांच्या शेती धरणात जात आहेत. प्रतिएकर पाच लाख किंवा जागेबदली जागा किंवा पुनर्वसन करण्यात यावे. आता बाधित शेतकरी यांनी वकिलांमार्फत जिल्हाधिकारी यांना नोटीस देऊन यात दिवसांची मुदत देण्यात येईल. तसेच न्यायालयात दाद मागू. सदर धरणामुळे सिंचनाचा कुणालाच फायदा नाही. त्यामुळे आता रमन राणे, हंसराज मेश्राम व बाधित शेतकरी आमरण उपोषणाच्या तयारीत असल्याचे कळविण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)
७० एकर जागा सातबारामधून गायब
By admin | Published: January 18, 2016 2:10 AM