लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया व तिरोडा नगराच्या खुंटलेल्या विकासाला चालना मिळावी यासाठी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी नगरविकास मंत्रालयाशी पाठपुरावा करीत दोन्ही जिल्ह्यांतील नागरी संस्थांना अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या होत्या. यामुळे नगरविकास मंत्रालयाने विशेष रस्ता अनुदान व वैशिष्ट्यपूर्ण लेखाशिर्षकांतर्गत गोंदिया व तिरोडा दोन्ही नगर परिषदांकरिता ७.१८ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून शहराच्या वैशिष्ट्यपूर्ण कामांसह अनेक रस्त्यांचे बांधकाम पूर्णत्वास येणार आहेत. गोंदिया व तिरोडा या दोन नागरी क्षेत्रासह भंडारा जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, नगरपंचायतीच्या विकासकामांना गती देण्याच्या अनुषंगाने खासदार पटेल यांनी कोरोना संसर्ग संपुष्टात येताच राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. नगरविकास मंत्रालयाशी संपर्क साधून दोन्ही जिल्ह्यांतील नगरपंचायत व नगर परिषदांना जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली. या अनुरूप नगरविकास मंत्रालयाने वैशिष्ट्यपूर्ण व विशेष रस्ता अनुदान लेखाशिर्षकांतर्गत तिरोडा व गोंदिया या दोन्ही नगर परिषदांकरिता ७.१८ कोटींचा निधी मंजूर केला आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत गोंदिया नगर परिषदेकरिता ४५ लाख व तिरोडा नगर परिषदेकरिता ३२ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे विशेष रस्ता अनुदान या लेखाशिर्षकांतर्गत गोंदिया नगर परिषदेकरिता १.४१ कोटी व तीन कोटी २४ लाख ४० हजार रुपये तसेच, तिरोडा नगर परिषदेकरिता एक कोटी नऊ लाख ८० हजार व एक कोटी १० लाख असा दोन्ही नगर परिषदेकरिता विशेष रस्ता अनुदान अतंर्गत ६.६४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. वैशिष्ट्यपूर्ण व विशेष रस्ता अनुदान या दोन्ही योजनेंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील दोन्ही नगर परिषदांना ७ कोटी ६२ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या माध्यमातून गोंदिया व तिरोडा शहराच्या विकासकामांना गती मिळणार आहे. गोंदिया व तिरोडा या दोन्ही शहरांच्या विकासकामांसाठी माजी आमदार राजेंद्र जैन यांनी खासदार पटेल यांचे लक्ष वेधले होते, हे विशेष.