जूनअखेरीस पूर्ण होणार ७५० कामे
By admin | Published: June 13, 2016 12:15 AM2016-06-13T00:15:07+5:302016-06-13T00:15:07+5:30
जिल्ह्याला सुजलाम्-सुफलाम् बनविण्याच्या दिशेने सर्व विभागांची कामे सुरू आहेत.
जलयुक्त शिवार अभियान : २८२ कामे प्रगतिपथावर, १५ नवीन कामे पूर्ण
गोंदिया : जिल्ह्याला सुजलाम्-सुफलाम् बनविण्याच्या दिशेने सर्व विभागांची कामे सुरू आहेत. त्यानुसार जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१५-१६ मधील २८२ व २०१६-१७ मधील ४६८ कामे प्रगतिपथावर आहेत. ही सर्व कामे ३० जून पूर्वी करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१५-१६ मधील मंजूर कामांमधून ेकृषी, जिल्हा परिषद लघु सिंचन विभाग, पंचायत समिती, वन विभाग व अदानी च्या माध्यमातून जिल्ह्यातील ९४ गावांत १२६६ कामे पूर्ण करण्यात आली. उर्वरीत २८२ कामे प्रगतिपथावर आहेत. सन २०१६-१७ मध्ये जिल्ह्यातील ७७ गावांसाठी ७१६ कामे मंजूर करण्यात आली. यातील १५ कामे पूर्ण करण्यात आली असून ४६८ कामे प्रगतिपथावर आहेत. पूर्ण करण्यात आलेल्या कामांमध्ये कृषी विभागाची ८ कामे व पंचायत समितीच्या ७ कामांचा समावेश आहे. तर प्रगतिपथावर कृषी विभागाची २७४, पंचायत समितीची ४५, लघु सिंचन विभागाची २१ व वन विभागाच्या १२८ कामांचा समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)
३७.८८ कोटी खर्च
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात गाळ काढण्याची १८४ कामे सुरू करण्यात आली होती. ही काम पूर्ण करण्यात आली असून यातून ३ लाख २१ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला. सन २०१५-१६ या वर्षात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात १४ हजार १११ टीसीएम पाणी जमा झाले होते. सन २०१६-१७ या वर्षात होणाऱ्या कामांमुळे २८ हजार टीसीएम अतिरिक्त पाणी जलस्रोतांमध्ये गोळा होणार आहे. त्याचा रबी पिकांना फायदा होणार आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत आतापर्यंत ३७.८८ कोटी रूपये खर्च करण्यात आले आहे.
जलयुक्त शिवार अभियानाचे काम जिल्ह्यात जलदगतीने सुरू आहे. अभियान ३० जून पर्यन्त सुरू राहील. जून अखेरपर्यंत उद्दिष्ट साध्य करण्यात येईल. सन २०१५-१७ मधील काही कामे पूर्ण झाली आहेत. सुरू असलेली सर्व कामे जून अखेरपूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.
-अश्विनी एम.भोपाले
कृषी उपसंचालक, गोंदिया.