गोंदिया : कोरोना प्रतिबंधासाठी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे नियम घातले गेल्यामुळे त्याचा फायदा कोरोनासह इतर आजारांना आळा घालण्यासाठी झाला. कोरोना काळात अनेकांनी मास्क वापरल्याने व सुरक्षित अंतर राखल्याने क्षयरोगाचा प्रसार कमी झाला. जिल्ह्यात सध्या ७८३ क्षयरोग रुग्णांवर उपचार सुरु असून त्यातील ६३८ क्षय रुग्णांना केंद्र शासनाच्या निक्षय पोषण योजनेतून प्रति महिना
५०० रुपये अनुदान सकस पोषण आहारासाठी देण्यात येत आहे.
जिल्ह्यात पूर्वी क्षयरोगाचे प्रमाण अधिक होते. राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत ते अजूनही जास्तच आहे. परंतु कोरोना काळात आवश्यक ती खबरदारी प्रत्येकाकडूनच घेतली गेल्याने या काळात सदर रोगाचा प्रसार पूर्वीपेक्षा कमी झाला. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी
औषधोपचारांची काळजी घेतल्याने क्षयरोग बरा होण्याचे प्रमाणही वाढले. क्षयरोग रुग्णांचे निदान करुन त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे प्रयत्न केले जात आहेत. जे क्षयरुग्ण उपचार घेत आहेत त्यांना निक्षय पोषण योजनेतून दर महिन्याला ५०० रुपये देण्यात येतात. या रुग्णांना शासनाकडून औषधे मोफत मिळतात. रुग्णांना औषधोपचारासह सकस आहार मिळावा यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ रुग्णांना उपचार सुरु असेपर्यंत दिला जातो. क्षयरोग रुग्णांना पौष्टिक आणि आरोग्याला लाभदायक आहार घेता यावा यासाठी क्षयरोग कार्यालयाकडून प्रति महिना पोषण आहार भत्ता म्हणून ५०० रुपये दिले जातात.
...........
२० महिन्यात क्षयरोगमुक्त
क्षयरोग रुग्णांचे वेळीच निदान झाले तर, तो रुग्ण सहा महिन्यात पूर्णपणे बरा होण्याची शक्यता अधिक आहे. एमडीआर टीबी नियंत्रणात आणण्यासाठी सुमारे २८ महिन्याचा कालावधी लागतो.
...........
क्षयरोगाची लक्षणे
रात्री येणारा ताप, १५ दिवसापेक्षा जास्त कालावधीपर्यंत खोकला, छातीत दुखणे, खोकल्यातून रक्त पडणे, वजन कमी होणे ही क्षयरोगाची लक्षणे आहेत. यातील कोणतेही लक्षणे आढळून आल्यास लगेचच थुंकीची तपासणी करणे आवश्यक आहे.
........