८७ गावांना अतिवृष्टीचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2017 12:58 AM2017-06-05T00:58:14+5:302017-06-05T00:58:14+5:30
पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे. धो-धो कधी बरसेल, याचा नेम नाही. अतिवृष्टी झाली तर, जिल्ह्यातील नदीकाठावरील ८७ गावांना अतिवृष्टीच्या संकटाला सामोरे जाण्याची शक्यता आहे.
पुनर्वसनाचा प्रश्न कायम : हजारो कुटुंबे उघड्यावर येण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे. धो-धो कधी बरसेल, याचा नेम नाही. अतिवृष्टी झाली तर, जिल्ह्यातील नदीकाठावरील ८७ गावांना अतिवृष्टीच्या संकटाला सामोरे जाण्याची शक्यता आहे. परिणामी, हजारो कुटूंबे उघड्यावर येण्याची दाट शक्यता आहे. प्रशासनाकडून त्यादृृष्टीने उपाययोजना आखल्या जात असल्या तरी, पुनर्वसनाचा प्रश्न आजही कायम आहे.
मृग नक्षत्राला अवघे तीन दिवस शिल्लक आहेत. याच नक्षत्रापासून खऱ्या अर्थाने पावसाळा सुरु होत असल्याचे बोलले जाते. तशी वातावरण निर्मिती देखील झाली आहे. सकाळी ऊन, सायंकाळी तुरळक पाऊस हे चित्र सद्य:स्थितीत जिल्ह्यात आहे. पावसाळ्यात कधी मुसळधार तर, कधी अतिवृष्टी होते. याचा फटका अनेकांना चांगलाच बसतो. त्यात नदीकाठावर वसलेल्या लोकांचे हाल होतात. बाघ, पुजारीटोला, कालीसरार, इटियाडोह हे मोठे तर, खैरबंदा, संग्रामपूर, बोदलकसा, चोरखमारा, रेंगेपार, चुलबंद, उमरझरी, मानागढ, कटंगी, कलपाथरी आदी मध्यम प्रकल्प जिल्ह्यात आहेत. वैनगंगा, गाढवी, बाघनदी, पांगोली नदी, चुलबंद नदी जिल्ह्यातून वाहते. गोंदिया तालुक्यातील ११, तिरोडा तालुक्यातील १३ गावे वैनगंगा नदीकाठावर वसले आहेत. गोंदिया तालुक्यातील पाच, आमगाव तालुक्यातील १६, सालेकसा तालुक्यातील ११ गावे, देवरी तालुक्यातील ११ गावे ही बाघनदी काठावर वसले आहेत. आंभोरा, बरबसपुरा, फुलचूर (जिल्हा कार्यालयाकडील भाग) ही गोंदिया तालुक्यातील तीन गावे पांगोली नदीकाठावर आहेत. सडक-अर्जुनी तालुक्यातील ४ गावे चुलबंद नदीकाठावर आणि अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १३ गावे गाढवी नदीकाठावर वसली आहेत. मुसळधार आणि अतिवृष्टीत या गावांना दरवर्षीच पूराचा फटका बसतो. अनेकांची घरे जमीनदोस्त होतात. काही घरांच्या पायथ्याशी नदीचे पाणी येते. त्यामुळे रहिवाशांना दैनंदिन गरजांची पूर्तता करण्यात मोठी अडचण होते. अनेकांना बाहेर पडणेही कठीण होऊन जाते. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न बिकट होतो. जनावरे मरणासन्न अवस्थेत असतात. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.