विद्यार्थ्यांच्या जीवावर उठल्या शाळा, तब्बल ९२५ वर्गखोल्या मृत्यूशय्येवर
By नरेश रहिले | Published: November 1, 2022 02:21 PM2022-11-01T14:21:57+5:302022-11-01T14:23:01+5:30
लोकप्रतिनिधी लक्ष घालतील काय ?
गोंदिया : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राने प्राथमिक शिक्षणात आमूलाग्र बदल करण्याचा मानस बांधला असला तरी भौतिक सुविधेअभावी पाहिजे त्या प्रमाणात जिल्हा परिषद शाळांचा उत्थान होऊ शकला नाही. आजही गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या तब्बल ९२५ वर्ग खोल्या विद्यार्थ्यांच्या जीवावर उठल्या आहेत.
शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम सुरू केला. या उपक्रमातून वाचन आनंद दिवस, ज्ञान रचनावाद, डिजिटल शाळा, अक्षर सुधार कार्यक्रम असे विविध उपक्रम घेण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थी शहरातील खासगी शाळांच्या विद्यार्थ्यांपेक्षा ही स्मार्ट व्हावा यासाठी शिक्षण विभागाने विविध उपक्रम राबविले. भौतिक सुविधेसाठी ‘ गावची शाळा-आमची शाळा ’ हा उपक्रम सुरूच ठेवला. परंतु अपुऱ्या निधीमुळे गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ९२५ वर्गखोल्या ज्ञानार्जनासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत धोकादायक आहेत, अशी कबुली स्वत: जिल्हा परिषद देत आहे.
९२५ वर्गखोल्या धोकादायक
जीर्ण वर्गखोल्यांची संख्या तालुकानिहाय
- अर्जुनी-मोरगाव- ८५
- आमगाव-१२९
- देवरी-५५
- गोंदिया-१८४
- गोरेगाव-१०४
- सालेकसा-८५
- सडक-अर्जुनी-१२७
- तिरोडा-१५६
एकूण-९२५
ठाणेगावातील घटनेची पुनरावृत्ती होऊ नये
मागील ७ वर्षापूर्वी तिरोडा तालुक्यातील ग्राम ठाणेगाव येथील विद्यार्थ्यांचा वर्ग खोलीचा छत कोसळल्याने शाळेतच मृत्यू झाला होता. वर्गखोल्या धोकादायक आहेत. तरी देखील त्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जन करावे लागत आहे.
शौचालयांचीही स्थिती वाईट
गोंदिया जिल्ह्यातील जि.प. शाळांमधील शौचालयांचीही स्थिती अत्यंत बेकार आहे. मुला-मुलींसाठी असलेल्या शौचालयांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. मुलींसाठी वेगळ्या शाैचालयाचीही सोय आहे परंतु स्थिती बेकार आहे.
मुख्याध्यापकांचा जीव टांगणीला
मागे तिरोडा तालुक्यातील ग्राम ठाणेगाव येथे भिंत पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. अशी दुर्दैवी घटना टाळण्यासाठी वर्गखोल्या नवीन असाव्यात.
मुले शाळेत वावरताना कुठेही जातात. यातच जीर्ण असलेल्या वर्गखोलीकडे जाणे किंवा त्या वर्गखोल्यांमधून शिक्षण देणे हे योग्य नाही. हे कुणाच्याही जीवावर बेतू शकते. त्यासाठी नवीन वर्गखोल्या देण्यात याव्यात.
- जयपाल ठाकूर, सहायक शिक्षक, भोसा