गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जंगल परिसरातच हत्तींचा मुक्काम असून बुधवारी (दि.१२) रात्रीच्या सुमारास केशोरीपासून १२ किमी अंतरावरील नागणडोह येथे हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घालून झोपड्यांचे व सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे वस्तीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. येथील ३० ते ३५ नागरिकांना तिडका येथे सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार हत्तींचा कळप बुधवारी सकाळी उमरपायली जंगलाच्या दिशेने गेल्याचे गावकऱ्यांनी पाहिले. दरम्यान रात्रीच्या सुमारास हत्तींच्या कळपाने नागणडोह येथील वस्तीत धुमाकुळ घातला. या ठिकाणी दहा पंधरा घरांची वस्ती असून ३० ते ३५ जण झोपड्या बांधून राहतात. दरम्यान रात्रीच्या सुमारास हत्तींच्या कळपाने हल्ला करुन झोपड्यांची नासधूस केली. काही झोपड्यांच्या भिंती देखील पाडल्या. तर घरातील जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान केले.
ही घटना बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे या वस्तीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान गुरुवारी सकाळी या घटनेची माहिती या वस्तीतील लोकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच गोठणगाव वनविभागाचा स्टॉप, आरआरटी पथक आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून मदत कार्याला सुरुवात केली.
वस्तीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन येथील नागरिकांना बोरटोला येथे हुलविण्यात आले आहे. हत्तींचे या परिसरात वास्तव्य असे पर्यंत या नागरिकांची बोरटोला येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.