लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : कोहमारा-देवरी महामार्गावरील ससेकरण देवस्थान घाटात रासायनिक द्रव्य वाहून नेणारा ट्रक जळून भस्मसात झाल्याची रविवारी (दि.१३) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे सकाळी बराच वेळ या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील कोहमारा-देवरी मार्गाने रासायनिक द्रव भरलेला डब्ल्यूबी २३, ई ३०९३ क्रमांकाचा ट्रक कोलकत्याकडे जात असताना या मार्गावरील ससेकरण घाटातील देवपायली नाला परिसरात पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ट्रकला अचानक आग लागली. ही चालक आणि वाहकाच्या लक्षात येताच ते ट्रकच्या बाहेर पडले. यानंतर या घटनेची माहिती मिळताच डुग्गीपार पोलीस ठाण्याचे ठाणेदार सचिन वांगळे आणि महामार्ग पोलीस केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत भुते आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले व अग्निशमन दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रकमधील ज्वलनशील पदार्थामुळे काही वेळातच जळून खाक झाला. या घटनेत ट्रकचा चालक व वाहक सुरक्षित असून, सकाळपर्यंत मार्गावरील वाहतूक ठप्प होती. दरम्यान, सडक अर्जुनी, देवरी, गोंदिया याच्या अग्निशामक गाडीच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. अशोक टोलनाका व अग्रवाल बिल्डकॉनच्या क्रेन व जेसीबीच्या साहाय्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. पुढील तपास पोलीस ठाण्याचे ठाणेदार सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनात बीड जमादार व्यंकट नागपुरे करीत आहे.