अतिवेग अन् चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यानेच अपघात; आरटीओच्या प्राथमिक चौकशीत पुढे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2024 10:24 AM2024-12-01T10:24:04+5:302024-12-01T10:24:18+5:30
परिवहन आयुक्त, पोलिसांना देणार अहवाल
गोंदिया : सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी डव्वाजवळ झालेल्या शिवशाही बसच्या अपघातात ११ प्रवासी ठार, तर २९ प्रवासी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.२९) घडली. हा अपघात बसचा अधिक व बसवरील चालकाचे सुटलेले नियंत्रण यामुळेच झाल्याचे नागपूर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी शनिवारी (दि.३०) घटनास्थळी भेट देऊन केलेल्या प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. या अपघातास बस चालकच कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भंडारा-गोंदिया शिवशाही बसचा शुक्रवारी सकाळी अपघात झाला.. ही बस सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वावरून खजरीकडे जाताना चालकाने बसचा वेग वाढविला. दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नाने चालकाने अचानक ब्रेक लावला. परिणामी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. सुरुवातीला बस उजवीकडून डावीकडे अशी होत उलटली. बसचा वेग अधिक असल्याने ती जवळपास २० फूट घासत गेल्याने हा अपघात घडला. बस अनियंत्रित होऊन त्यावरील बस चालकाचे नियंत्रण सुटल्यानेच हा अपघात घडला आहे. या अपघातास बस चालकच जबाबदार असल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले असल्याचे नागपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चव्हाण यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शनिवारी खजरी येथील घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.
आयुक्तांकडे सादर करणार अहवाल
खजरी येथे झालेल्या शिवशाहीच्या अपघाताची प्राथमिक चौकशी पूर्ण झाली आहे. आता सविस्तर अहवाल तयार करून तो परिवहन आयुक्त व पोलिस विभागाकडे सादर केला जाणार आहे.
शिवशाही बसच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून शिवशाही बसेसच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याची बाब पुढे आली आहे. काही बसची स्थिती अत्यंत बिकट आहे; पण यानंतरही त्या रस्त्यावर धावत आहे. परिणामी अपघातात वाढ होत असल्याची ओरड या विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांकडून होत आहे.