गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एका दहाव्या वर्गाच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या शाळेतील स्वयंपाकीला जिल्हा सत्र न्यायालयाने १५ जुलै रोजी तीन वर्षांचा सश्रम कारावास व १६ हजार रुपये दंड ठोठावला आहे. ही सुनावणी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश शुभदा तुळणकर यांनी केली आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आरोपी भोजराज मेघनाथ सोनवाने (४०) हा एका शाळेत स्वयंपाकी म्हणून काम करीत होता. दहाव्या वर्गातील एका सोळा वर्षाच्या पीडितेला ५०० रुपये देऊन १८ मार्च २०१४ रोजी रात्री ८ वाजता तिच्यावर बळजबरी करण्याचा त्याचा प्रयत्न होता. या प्रकरणात त्याने विनयभंग केल्यामुळे यासंदर्भात नवेगावबांध पोलिसांत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश शुभदा तुळणकर यांनी सुनावणी करताना बाललैंगिक अत्याचार अधिनियमचे कलम ७ अंतर्गत आरोपीला ३ वर्षांचा सश्रम कारावास, १६ हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास एक महिन्याच्या अतिरिक्त कारावास कलम १२ व १३ अंतर्गत तीन वर्षांचा सश्रम कारावास, पाचशे रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास एक महिन्याचा साधा कारावास, कलम ३४२ अंतर्गत एक महिन्याचा कारावास एक हजार रुपये दंड ठोठावला आहे. या प्रकरणात तीन वर्षांचा सश्रम कारावास व १६ हजार रुपये दंड आरोपीला ठोठावला. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून कृष्णा पारधी यांनी १४ साक्षीदार तपासले. या प्रकरणाचा तपास एम. के. आदलिंग यांनी केला होता. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस शिपाई रवींद्र पारधी यांनी कामकाज पाहिले.