गोंदिया : व्हॅनमधून दारूची अवैध वाहतूक करीत असताना पोलिसांनी व्हॅन चालकाला पकडून देशी दारू व वाहन जप्त केले. सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत साखरीटोला ते बिजेपार मार्गावरील वारकरीटोला येथे सोमवारी (दि.१४) ११:४० वाजता दरम्यान ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी व्हॅन व दारू असा एकूण दोन लाख ६६ हजार ८०० रुपयांचा माल जप्त केला आहे.
अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलिस पथकाकडून सोमवारी रात्री पेट्रोलिंग केली जात असताना व्हॅनमधून दारूची वाहतूक केली जाणार असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली. यावर पथकाने साखरीटोला -बिजेपार मार्गावरील ग्राम वारकरीटोला येथे नाकाबंदी केली. अशात रात्री ११:४० वाजता दरम्यान मारुती व्हॅन क्रमांक एमएच ३१-डिके ०४०९ मार्गावर आली असता पोलिसांनी व्हॅन थांबवून चालकाला विचारपूस केली असता त्याने महेंद्र योगराज गौतम (३४, सावली, देवरी) सांगितले. पथकाने गाडीची पाहणी केली असता त्यात ५ बॉक्समध्ये देशी दारूच्या २४० बाटल्या आढळून आल्या.
यावर पथकाने १६ हजार ८०० रुपये किमतीची दारू व दोन लाख ५० हजार रुपये किमतीची व्हॅन असा एकूण दोन लाख ६६ हजार ८०० रुपयांचा माल जप्त केला. तसेच महेंद्र गौतम विरूद्ध मदाका कलम ६५(ई), ७७ (अ) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, पोलिस उपनिरीक्षक अमोल मुंडे, शिपाई इंगळे, बेदक, महिला शिपाई आंबाडारे यांनी केली आहे.
महिलेच्या घरातूनही पकडली दारू
- विशेष म्हणजे, पथकाने पेट्रोलिंग दरम्यान माहितीच्या आधारे सायंकाळी ५:१५ वाजतादरम्यान गल्लाटोला-पिपरीया येथील रहिवासी अनुसया लेखराम गणवीर (६०) यांच्या घरावर धाड घातली. यामध्ये त्यांच्या घरातील बेडरूममध्ये एका थैल्यात देशी दारूच्या १८० मिलीच्या ३२ तसेच ९० मिलीच्या ३५ बॉटल्स मिळून आल्या. पोलिसांनी एकूण तीन हजार ४६५ रुपये किमतीची दारू जप्त केली असून अनुसया गणवीर यांच्यावर मदाका कलम ६५(ई), ७७(अ) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.