खोटे व खोडतोड केलेले बिल जोडून लाखो रुपयांची उचल
By admin | Published: January 19, 2016 02:51 AM2016-01-19T02:51:30+5:302016-01-19T02:51:30+5:30
तालुक्यातील जमुनिया व काचेवानी या दोन्ही गावांमध्ये तत्कालीन ग्रामसेवक पी.एच.वासनिक यांनी खोटे व खोडतोड
तिरोडा : तालुक्यातील जमुनिया व काचेवानी या दोन्ही गावांमध्ये तत्कालीन ग्रामसेवक पी.एच.वासनिक यांनी खोटे व खोडतोड केलेल्या बिलांची फाईलला जोडणी करून लाखो रुपयांचा अपहार केल्याची तक्रार सरपंच, ग्रा.पं.सदस्यांनी केली. मात्र त्या तक्रारीचा अहवाल मागील दोन वर्षापासून प्रलंबित आहे. गटविकास अधिकाऱ्यांकडूनही गोलमाल आणि उडवा-उडवीचे उत्तर दिले जात आहे. त्यामुळे या प्रकरणातील संशय आणखीच बळावत आहे.
आठ दिवसात अहवाल सादर करतो, असे उत्तरे मागील अनेक दिवसांपासून दिले जात आहेत. तत्कालीन पं.स.सदस्य रमेशकुमार पटले यांनीसुध्दा पं.स.च्या सभेत हा मुद्दा लावून धरला होता. तत्कालीन बीडीओ जमईवार यांनीसुध्दा याबाबत टाळाटाळ केली. त्यांची बदली झाली, पं.स.विस्तार अधिकारी यांचीही बदली या काळात होऊन गेली. नवीन बीडीओ मानकर आलेत. विस्तार अधिकारी निमजे यांचेकडे चार्ज देण्यात आला. परंतु आजपर्यंत चौकशी अहवाल पंचायत समितीला सादर करू शकले नाही.
याबाबत पं.स.ला काही ग्रा.पं.सदस्यांनी माहितीचा अधिकार लावून माहिती मागविली. परंतू त्यांनासुध्दा या अहवाल अजूनपर्यंत मिळालेला नाही. आता नवीन पं.स.सभापती, उपसभापती व सदस्यांनी हा मुद्दा लावून धरला आहे. शुक्रवारला बीडीओ व पंचायत विस्तार अधिकारी यांना सभापतीच्या चेंबरमध्ये बोलवून उपसभापती व सदस्यांनी चांगलीच कानउघाडणी केली.
ग्राम पंचायत जमुनिया येथे ग्रामसेवक पी.एच.वासनिक यांनी लाखो रुपयांची खोटी व खोडतोड केलेली बिले जोडल्याचा आरोप केला जात आहे. पाणीपट्टी फंड, तंटामुक्ती अनुदान, पर्यावरण ग्रा.स.योजना, सामान्य फंड, १३ वा वित्त आयोग अशा विविध शिर्षकाखाली खोट्या व खोडतोड केलेल्या बिलांची जोडणी केली व लाखो रुपयांचा अपहार झाल्याचा संशय आहे. सत्र २०१२-२०१३ ते सत्र २०१४-१५ या काळात हा अपहार झाल्याचा आरोप आहे. (शहर प्रतिनिधी)
बीडीओंचे नियंत्रण नाही
४पंचायत समितीची मासिक सभा दि. १६ जानेवारी २०१६ रोजी आयोजित करण्यात आली होती. या सभेला संबंधित विभागाचे अधिकारी हजर राहात नसल्याने ही सभा वारंवार तहकुब केली जात आहे. मागील अनेक सभेच्या माध्यमातून असे लक्षात येते की, एकूण १६ विभागांपैकी केवळ ८-१० विभागातील कर्मचारी-अधिकारी उपस्थित असतात. बाकी अनुपस्थित राहतात. कारण त्यांच्यावर बीडीओंचे नियंत्रण नाही, असा आरोप उपसभापती किशोर पारधी यांनी केला.
४यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून वास्तविक परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण कोणीच यावर स्पष्टपणे बोलायला तयार नाहीत. त्यामुळे शंकेचे वातावरण पसरले असून यावर तातडीने कार्यवाही करण्याची अपेक्षा केली जात आहे.