आंदोलनापूर्वी रेल्वे प्रशासन झुकले
By admin | Published: September 6, 2016 01:44 AM2016-09-06T01:44:03+5:302016-09-06T01:44:03+5:30
तिरोडा तालुक्याच्या सालेबर्डीचे रेल्वे फाटक अचानक बंद करण्याचा अफलातून आदेश काढण्याच्या रेल्वे
‘रेल रोको’ टळले : पर्यायी व्यवस्था होईपर्यंत सालेबर्डी रेल्वे फाटक सुरू राहणार
काचेवानी : तिरोडा तालुक्याच्या सालेबर्डीचे रेल्वे फाटक अचानक बंद करण्याचा अफलातून आदेश काढण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाविरोधात सोमवारी (दि.५) रेले रोको आंदोलनासाठी माजी आ.दिलीप बन्सोड आणि जि.प.सदस्य मनोज डोंगरे यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात नागरिक जमले होते. मात्र रेल्वे प्रशासनाने वेळीच या आंदोलनाची दखल घेऊन पर्यायी व्यवस्था होईपर्यंत रेल्वे फाटक बंद करणार नाही, अशी ग्वाही दिली. त्यामुळे हे प्रस्तावित आंदोलन मागे घेण्यात आले.
तुमसरचे रेल्वे सहायक मंडळ अभियंता यांनी १९ आॅगस्ट २०१६ च्या पत्रान्वये मांडवी आणि सालेबर्डी सरपंचाच्या नावे पत्र देवून रेल्वे फाटक क्रमांक ५२५ हे ५ सप्टेंबर २०१६ पासून पूर्णत: बंद करीत असल्याचे कळविले. हे रेल्वे फाटक बंद होत असल्याने रेल्वे फाटक क्रमांक ५२४ किमी १०३४/१-३ पासून नागरिकांनी आवागमन करावे, असे त्या पत्रात सूचविले होते. मात्र हा आदेश अन्यायकारक असल्याने ग्रा.पं.सह ५ ते ७ गावातील नागरिकांत उद्रेक पसरला. त्यांनी क्षेत्राचे जि.प.मनोज डोंगरे आणि माजी आ.दिलीप बंसोड यांच्या कानावर ही गोष्ट टाकल्यानंतर त्यांनी सालेबर्डी रेल्वे फाटक बंद होवू देणार नाही, आपण घाबरू नका, असे आश्वासन देवून अधिकाऱ्यांच्या भेटी-गाठी घेतल्या.
दोन्ही नेत्यांनी वरिष्ठ मंडळ अभियंता (मध्य.) दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे, नागपूर यांना निवेदन दिले. त्यांनी त्यावर विचार करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांची भेट परिसरातील सरपंचासोबत भेट घेतली. त्यावेळी पर्यायी व्यवस्था होईपर्यंत आणि स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत) यांना विश्वासात घेवून (एनओसी) कारवाई करण्यात यावी, असे पत्र रेल्वे प्रशासनाला देण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी शिष्टमंडळाला सांगितले.
दरम्यान ठरल्याप्रमाणे सोमवारी (दि.५) रेल रोको आंदोलन करण्याची जय्यत तयारी माजी आ.बंसोड यांच्या नेतृत्वात मनोज डोंगरे, पं.स.सदस्य मनोहर राऊत, सरपंच विनोद लिल्हारे, अरविंद बोंबडे, पोलीस पाटील श्याम नागपुरे, रक्षपाल लिल्हारे, मधुकर भरणे, सोनोलीचे पोलीस पाटील खुनेश ठाकरे, अमोल मोहारे, भुराज मोहारे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शेकडो नागरिक रेल रोको आंदोलनासाठी सालेबर्डी फाटकाजवळ सरसावले. प्रकरणाचे गांभिर्य ओळखून तिरोडा ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळी यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी हजर होते. यावेळी नेत्यांनी भाषणातून रेल प्रशासनाचा निषेध करीत रेल्वे फाटक बंद केल्यास परिसरातील नागरिकांच्या येणाऱ्या अडचणींची माहिती दिली. मांडवी, सोनोली, सालेबर्डी, मुंडीपार, भोंबुडी, बिरोली आणि चांदोरी या गावांतील शेतकऱ्यांना, नागरिकांना, शिक्षित मुलांना येणाऱ्या अडचणीची माहिती दिली. (वार्ताहर)
रेल्वे प्रतिनिधींचे आश्वासन
४या आंदोलनादरम्यान रेल्वेचे एसएससी, पीडब्ल्यू व तुमसरचे बी.एन.पांडे हे अधिकारी पोहोचले आणि उपस्थित जनसमुदायाला रेल्वे प्रशासनाचा निर्णय त्यांनी वाचून दाखविला. या ठिकाणी अंडरग्राऊंड (भुयारी रस्ता) मार्गाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत सालेबर्डी फाटक बंद होणार नाही. हे रेल्वे प्रशासनाच्या वतीने मी याबद्दल आश्वस्त करतो, असे त्यांनी सांगितले. त्याचे नागरिकांनी स्वागत केले.
४हा रस्ता जि.प.चा असल्याने रेल्वे प्रशासनाने जि.प.ला कळविणे गरजेचे होते. मात्र रेल्वे प्रशासनाने तसे कोणतेही पत्र दिले नव्हते किंवा कोणतीही मंजुरी घेण्यात आली नसल्याचे जि.प.तर्फे मनोज डोंगरे यांनी स्पष्ट केले.