आणखी एका घराला ठोकले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:54 AM2021-02-18T04:54:52+5:302021-02-18T04:54:52+5:30
गोंदिया : मालमत्ता कर वसुलीसाठी सिलिंगचा धडाका सुरू असतानाच कर वसूल पथकाने बुधवारी (दि.१७) आणखी एका घराला सील ठोकले, ...
गोंदिया : मालमत्ता कर वसुलीसाठी सिलिंगचा धडाका सुरू असतानाच कर वसूल पथकाने बुधवारी (दि.१७) आणखी एका घराला सील ठोकले, तर आणखी काहींवर कारवाईची तयारी होती. मात्र, त्यांनी कराचा भरणा केल्याने त्यांच्यावरील कारवाई टळली. मात्र, पथकाचा सिलिंगचा धडाका सुरू असल्याने आता मालमत्ताधारकांत भीती दिसून येत आहे.
बुधवारी उपमुख्य अधिकारी विशाल बनकर यांच्यासह पथकाने सुभाष वॉर्ड क्रमांक- ३१, रावण मैदानाजवळील भेरूमल मूलचंद गोपलानी यांच्या घराला सील ठोकले. त्यांच्याकडे सन २००३ पासून ३५ हजार २५४ रुपयांची थकबाकी आहे. त्यानंतर उद्धवदास जसुजा यांच्यावर सिलिंगची कारवाई करणार होते. मात्र, त्यांनी कराचा भरणा केल्यामुळे त्यांच्यावरील सिलिंगची कारवाई टळली, तसेच चंद्रशेखर वॉर्डातील नत्थू लिखिराम नागपुरे, माधवदास खटवानी व भोजराज ठाकरे यांना अधिपत्र बजावून सिलिंगची कारवाई केली जाणार होती. मात्र, यांनीही कराचा भरणा केल्याने त्यांच्यावरील कारवाई टळली.
---------------------
मालमत्ता व घरातील सामानाची जप्ती
कर वसुली पथकाकडून थेट सिलिंगची कारवाई केली जात असल्याने बहुतांश थकबाकीदारांकडून लगेच कराचा भरणा करून सिलिंग टाळले जात आहे. मात्र, कित्येक जण कराचा भरणा करीत नसल्याने त्यांच्या मालमत्तांना पथक सील करीत आहे. आता मात्र थकबाकी वसुलीसाठी थकबाकीदारांची घरे व घरातील सामानाची जप्तीही केली जाणार आहे.