केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यासह केशोरी परिसरात वाढणाऱ्या कोरोना संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनसह ५० खाटांची व्यवस्था करण्याची मागणी योगेश पाटील नाकाडे, चेतन दहीकर, अरुण मस्के आदींनी केली असून, यासाठी जिल्हा आरोग्य विभागाला निवेदन दिले आहे.
गेल्या १ वर्षापासून कोरोना आजाराने थैमान घातले आहे. यापूर्वी या भागात कोरोनाचे रुग्ण नसल्यासारखेच होते; परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना संसर्गाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. कोरोना बाधित असलेल्या रुग्णांना होम क्वाॅरंटीन करून औषधेापचार करण्याचा सल्ला दिला जातो; मात्र गंभीर रुग्णांसाठी येथे कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसल्यामुळे ब्रम्हपुरी, गोंदिया व भंडारा या ठिकाणी पुढील उपचारासाठी पाठविले जाते; परंतु त्या ठिकाणीसुद्धा बेड उपलब्ध नसल्यामुळे कोरोना रुग्णांची गैरसोय होत आहे. परिणामी, गंभीर रुग्णांना जीव गमविण्याची वेळ येवून ठेपली आहे. यासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनसह ५० खाटांची व्यवस्था करून तत्काळ कोविड केंद्र तयार करण्यात यावे, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात बऱ्याच दिवसांपासून एमबीबीएस अर्हताधारक वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. या ठिकाणी बीएएमएस अर्हताधारक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खांद्यावर इळदा आणि केशोरी या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रासह पाच आरोग्य उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या २५००० हजार नागरिकांच्या आरोग्याचा डोलारा सांभाळावा लागत आहे. त्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस अर्हताधारक वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करून कोविड रुग्णांसाठी ५० खाटांची व्यवस्था उपलब्ध करून कोरोना केंद्राची निर्मिती करावी, अशी मागणी योगेश पाटील नाकाडे, चेतन दहीकर, अरुण मस्केसह नागरिकांनी निवेदनातून जिल्हा आरोग्य विभागाकडे केली आहे.