आमगाव : नगर परिषदेतील आठ गावे आधीच विकास आराखड्यापासून वंचित आहेत. दुसरीकडे वाढत्या लोकसंख्येनुसार पूर्वीच्या पाणीपुरवठा योजनेत पाण्यासाठी जनक्षोभ आहे. परंतु नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजुरी न मिळाल्याने शहरात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या नगर परिषद क्षेत्रातील वाढत्या लोकसंख्येनुसार पाणीपुरवठा योजनेचा विस्तार ही काळाची गरज आहे. परंतु प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने भविष्यात पाणीपुरवठ्याची समस्या वाढेल याची जाणीव प्रशासनाला असताना जाणिवपूर्वक टाळण्यात येत आहे.
आमगाव आणि किडंगीपार ही स्वतंत्र पाणी पुरवठा योजना त्याच्या भागाला पाणीपुरवठा करते. रिसामा, बिरसी, कुंभारटोली, पद्पूर, माल्ही ही गावे प्राधिकरणने केलेल्या बनगाव पाणीपुरवठा योजनेवर निर्भर आहे. आठ गावांच्या लोकसंख्येचा विचार करता उपलब्ध पाणीपुरवठा योजनवरील पाण्याची मागणी वाढली आहे. यात सद्यस्थितीत असलेली पाणीपुरवठा योजना ही अपुरी पडत आहे. याबाबत नागरिकांनी प्रशासनाला कळविले आहे. परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे भविष्यात पाणीपुरवठा योजनेसाठी समस्येची घंटा वाजू शकते. आमगाव व बनगावसाठी २ लाख ४० हजार लिटर, रिसामासाठी ३ लाख २० हजार लिटर, कुंभारटोलीसाठी ८५ हजार लिटर, माल्हीसाठी ४० हजार लिटर, पदमपूरसाठी १ लाख २० हजार लिटर तर किडंगीपारसाठी एक लाख लिटर पाणी दररोज लागते.
मात्र पाण्याची मागणी वाढल्याने त्याची पूर्तता करण्याकरिता अधिक पाण्याची गरज आहे. आज अनेक शहरांमध्ये नागरिक पाणीपुरवठ्याची वाट पाहत आहेत. पण पाणी उपलब्ध नसल्यामुळे पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईनचा विस्तार वाढविला गेला नाही. परिणामी नगर परिषद परिसरातील आठ गावे पिण्याच्या पाण्यासाठी तळमळत आहेत. ही समस्या लोकप्रतिनिधी आणि सरकार सोडवतील का, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
-------------------------
रस्ता बांधकामाचा पाईपलाईनला तडाखा
आमगाव- देवरी व आमगाव-लांजी राष्ट्रीय व राज्य महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने कंत्राटदार कंपन्या मुजोरशाहीने वागत आहेत. महामार्गावरील बांधकाम नियोजनात स्थानिक पाणी पुरवठा पाईपलाईन दुरुस्ती व नवीन बांधकाम असून सुद्धा या कंपन्या जाणिवपूर्वक या बांधकामात दिरंगाई करीत आहे. पाईपलाईनवर हातोडा घालून पुरवठा वारंवार खंडित करीत आहेत. तर नागरिकांना मिळत असलेले पाणी जमिनीत मुरत आहे.