बाबासाहेबांनी खऱ्या अर्थाने बेड्यातून बंधमुक्त केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:42 AM2018-03-28T00:42:15+5:302018-03-28T00:42:15+5:30
हजारो वर्षे या देशातील शोषित पिडीत, दलित आदिवासी बहूजन व महिलांना गुलामीच्या बेड्यातून बंधमुक्त करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेतून समता, बंधूता, न्याय, हक्क, स्वातंत्र्य देऊन भारमुक्त केले.
ऑनलाईन लोकमत
सालेकसा : हजारो वर्षे या देशातील शोषित पिडीत, दलित आदिवासी बहूजन व महिलांना गुलामीच्या बेड्यातून बंधमुक्त करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेतून समता, बंधूता, न्याय, हक्क, स्वातंत्र्य देऊन भारमुक्त केले. अशा महामानवाला समाज कधीच विसरु शकत नाही. अशा विश्वास राज्यातील प्रसिद्ध लेखिका व कवियित्री उषाकिरण आत्राम यांनी व्यक्त केला.
त्या दुसरे ग्रामीण आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्या बोलत होत्या.
राज्यस्तरीय दुसरे ग्रामीण आंबेडकरी साहित्य संममेलन खोपरीडोमा येथे घेण्यात आले. या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा बहुमान लेखिका व कथाकार से.नि.राजपत्रित अधिकारी उषाकिरण आत्राम यांना मिळाला. या बहुमानाबद्दल त्यांनी स्वत:ला आनंदीत व भाग्यवान मानले. त्यांची लोकमत प्रतिनिधीने विशेष मुलाखात घेतली. या मुलाखतीत त्यांनी मुक्त कंठाने बाबासाहेबांच्या कामगिरीची स्तुती केली व त्यांनी केलेल्या कामांना युगानुयुगे भारतीय समाजच नाही तर विश्व स्तरावर सदैव स्मरण केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उषाकिरण आत्राम म्हणाल्या की, स्त्रीयांसाठी गांभीर्याने विचार करीत बाबासाहेबांनी त्यांच्या मानवी हक्कासाठी स्वतंत्र साहित्य कोडबिल तयार केले आणि या विधेयकाला पंडीत नेहरु, डॉ. राजेंद्र प्रसाद, श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासारख्या धुरंधर लोकांनी कठोर विरोध दर्शविला. व विधेयक पारित न करता ते परत पाठविले होते. यासाठी बाबासाहेबांना कडवा विरोध पत्करावा लागला होता. शेवटी त्यांनी महिला विधेयकास मान्यता न मिळाल्याने निराशा होवून केंद्रीय कायदे मंत्री पदाचा राजीनामा २६ सप्टेंबर १९५१ रोजी दिला.
महिलांचे आत्मसम्मान, न्याय हक्कासाठी त्यांच्या स्वातंत्र्य व मानवी हक्कासाठी मंत्रीपदाचा त्याग करणारा हा महामानव बापापेक्षाही मोठा आहे, म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांचे भारतातल्या सर्व स्तरातील महिलांनी आभार मानायला पाहिजे. त्यांचे ऋण त्यांनी सदैव आठवण ठेवून विसरता कामा नये. त्यामुळे आम्ही आज सर्व क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करुन बंधमुक्त होऊन आकाश झेप घेत आहोत असे सांगितले.
आंबेडकरी साहित्यांचे मातृकोष आंबेडकर विचारधारा आहे. आंबेडकरी साहित्य हे शोषित, पिडीत्यांच्या वेदनेचे साहित्य आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य वास्तवाचे जिवंत चित्र उभे करणारे ऊर्जावान आणि सर्वांनाच मार्गदर्शक असे साहित्य असल्याचे आत्राम यांनी सांगितले.