जिल्हा रुग्णालयात नियमांकडे पाठ; कशी रोखणार कोरोनाची तिसरी लाट?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:02 AM2021-09-02T05:02:01+5:302021-09-02T05:02:01+5:30
गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला. कोरोनाने मृत्यूचे तांडव सुरू होते. दुसरी लाट ओसल्याने नियम शिथिल झाले. परंतु, ...
गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला. कोरोनाने मृत्यूचे तांडव सुरू होते. दुसरी लाट ओसल्याने नियम शिथिल झाले. परंतु, नियम शिथिल होताच लोक हलगर्जीपणे वागत आहेत. रुग्णालयात गर्दी करणे, विनामास्कने वावरणे, मास्क लावला तरी तो मास्क संपूर्ण तोंड व नाक झाकत नाही, मास्क हनुवटीलाच असतो. त्यामुळे त्यांना कोरोना होण्याचा धोका अधिक आहे. नागरिक व आरोग्य कर्मचारीही असा हलगर्जीपणा करीत असल्याने असा हलगर्जीपणा सुरू राहिला तर तिसरी लाट कशी रोखणार असा सवाल उपस्थित होत आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी जे नियम तयार करण्यात आले, त्या नियमाला लोक तिलांजली देत आहेत, सोबतच आरोग्य कर्मचारी, अधिकारी देखील नियमाला बगल देत रुग्णालयात वावरताना दिसत आहेत.
...................
ओपीडी हाऊसफुल्ल
- गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालय, बाई गंगाबाई स्त्री ररुग्णालयात दररोज २ हजार रुग्णांची गर्दी असते.
- सध्या तापाची साथ सुरू असल्याने सरकारी किंवा खासगी रुग्णालय हाऊसफुल्ल आहेत. त्यामुळे रुग्णालयात गर्दीच गर्दी दिसून येते.
- गर्दी असलेले नागरिक विनामास्कने वावरत आहेत. रुग्णांना उपचारासाठी घेऊन आलेले नागरिक स्वत:ही मास्क लावत नाहीत.
.............
डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढले
गोंदिया शहरात एकट्या ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे १० रूग्ण आढळले आहेत. त्यातील एका तरुणीचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे. मलेरियाचेही रुग्ण वाढत आहेत. आजारी पडल्यास उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑगस्ट महिन्यात १० रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत.
..........
रुग्णालयेच सुपर स्प्रेडर ठरू नये..
कोरोनाचा संसर्ग सुरूच आहे, धोका अजूनही टळला नसताना लोक रुग्णालयात हलगर्जीपणे वागत आहेत. आरोग्य कर्मचारीही दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे हे रुग्णालयेच कोरोनासाठी सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
.................
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा ()
गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांच्या मदतीसाठी आलेले रुग्णांचे नातेवाईक सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवित बिनधास्त मास्क न लावता रुग्णालयाच्या परिसरात गप्पा मारतात.
............
मास्क हनुवटीलाच
कोविड हेल्थ सेंटर आणि त्याच्या परिसरात वावरणारे काही लोक मास्क लावतात तर काही लोक मास्क लावत नाही. जे मास्क लावतात ते आपला मास्क हनुवटीलाच ठेवतात.