विटॅमिन ‘ए’चा बॅच नंबर वडेगाव केंद्राचाच
By Admin | Published: April 21, 2015 12:42 AM2015-04-21T00:42:00+5:302015-04-21T00:42:00+5:30
वडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या लाखेगाव उपकेंद्र परिसरात कालबाह्य औषधींचा साठा उघड्यावर फेकला आढळला.
बेवारस औषधी प्रकरण : अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी अंगलट येणार
गोंदिया : वडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या लाखेगाव उपकेंद्र परिसरात कालबाह्य औषधींचा साठा उघड्यावर फेकला आढळला. या औषधापैकी विटॅमिन ‘ए’चा बॅच क्रमांक वडेगावला पुरविलेल्या औषधाच्या बॅचसोबत जुळल्याची माहिती तिरोडाचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सी. आर टेंभूर्णे यांनी दिली आहे.
तिरोडा-वडेगाव मार्गावरील लाखेगाव जवळील विद्युत पारेषणच्या कार्यालयासमोर २०० ते ३०० औषधांच्या बाटल्या या ढिगाऱ्यात सापडल्या आहेत. या औषधांमध्ये सनसील १० मीली असून बॅच क्रं. एनएस २१२, एमएफजी डेट नोव्हेंबर १२ तर एक्सापरी डेट आॅक्टोंबर आहे. दुसरी औषध कॉन्सनट्रेटेड विटामीन ए सोल्यूशन आयपी ८५, १०० मिली असून बॅच क्रं. एलपी २०१९ एएल, निर्मिती नोव्हेंबर २०१२ तर एक्सपायरी डेट एप्रिल २०१४ आहे. त्याचप्रमाणे विटामेक्स ए सोल्यूशन बॅच क्र.एचएस १३६, एमएफजी डेट डिसेंबर २०१३, एक्सपायरी डेट नोव्हेंबर २०१४ आहे. तर क्लोरोक्विन फॉस्फेट सिरप आई पी, बॅच क्रमांक एलएचक्यू २००३ एएच, एमएफजी डेट जानेवरी १३ आणि जून १४ अशी आहे.
सदर चारही प्रकारच्या औषधी बेवारसपणे उघड्यावर सापडली. मात्र आरोग्य विभागाने या प्रकाराकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले. शुन्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना देण्यात येणारे वीटामीन ए (अ जीवनसत्वाच्या) औषधी व बालकांसाठी असलेल्या जंतनाशक औषधी उघड्यावर फेकण्यात आल्या. परंतु जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरिष कळमकर यांनी या प्रकरणाची चौकशी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सी.आर. टेंभूर्णे यांच्याकडे दिली होती. या संदर्भात चौकशी थातू-मातूर होत असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आता जिल्हास्तरीय चौकशी समिती नेमण्याचे ठरविले आहे. (तालुका प्रतिनिधी)
दोन सदस्यीय समिती राहणार
चौकशी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यावरच सोपविल्यामुळे प्रकरण दडपण्याचा प्रकार होऊ शकतो असे वृत्त प्रकाशित करताच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय शिवणकर व जि.प. उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती मदन पटले यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना जिल्हा स्तरीय समिती नेमा असे सांगितल्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी आता अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी व एक औषध निार्मण अधिकारी असे दोन सदस्यीय समिती नियुक्त करणार आहेत. ती समिती या प्रकरणाची चौकशी करणार आहे.
ती औषधी परिचराने उचलली
१४ एप्रिलला उघड्यावर आढळलेली औषधी वडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका परिचराने उचलल्याची विश्वसनिय माहिती आहे. ती औषधी कुणाच्या सांगण्यावररून चौकशीच्या पूर्वीच उचलली याची चौकशी होणे आवश्यक आहे. यातून या प्रकरणाचा छडा लागू शकतो.
नोडल अधिकारी आले
वडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत येणाऱ्या लाखेगाव येथे उघड्यावर फेकलेल्या औषधाची माहिती मिळाल्यामुळे नोडल अधिकारी मेश्राम या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली आहे. बाल आरोग्य अभियानासंदर्भात पाहणी करण्यासाठी आलेले नोडल अधिकारी बालकांच्या या औषधीला घेऊन त्यांनी या आरोग्य केंद्राला भेट दिली आहे.