नाल्यावर आंघोळ, उघड्यावर शौचास जाण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 09:50 PM2018-09-19T21:50:10+5:302018-09-19T21:50:28+5:30
बाबाटोली येथे जवळपास ३०० पेक्षा जास्त नागरिक राहत असून येथील एकाही कुटुंबाकडे प्रसाधनगृह व शौचालयाची सोय नाही. परिणामी येथील महिला व पुरुषांना गावापासून काही अंतरावर असलेल्या कुआढास नाल्यावर जाऊन आंघोळ करावी लागते. तर शौचालयाची सोय नसल्याने त्यांना उघड्यावर शौचास जावे लागते. अशात महिला, मुलींची मोठी कुंचबना होते.
विजय मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : बाबाटोली येथे जवळपास ३०० पेक्षा जास्त नागरिक राहत असून येथील एकाही कुटुंबाकडे प्रसाधनगृह व शौचालयाची सोय नाही. परिणामी येथील महिला व पुरुषांना गावापासून काही अंतरावर असलेल्या कुआढास नाल्यावर जाऊन आंघोळ करावी लागते. तर शौचालयाची सोय नसल्याने त्यांना उघड्यावर शौचास जावे लागते. अशात महिला, मुलींची मोठी कुंचबना होते.
मात्र बाबाटोलीतील नागरिकांच्या समस्येकडे अद्यापही प्रशासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष न गेल्याने त्यांच्या समस्या कायम असल्याचे चित्र आहे.
एकीकडे देशात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रत्येक घरी शौचालयाची व्यवस्था शासनामार्फत करुन देण्यात येत आहे. परंतु या योजनेचा लाभ बाबाटोली वासीयांना मिळाला नाही. त्यामुळे नाईलाजाने आजही येथील लोकांना उघड्यावर शौचास जावे लागत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचा जिल्हा हागणदारी मुक्तीचा दावा सुध्दा फोल ठरला आहे. केंद्र शासनातर्फे २०१९ पर्यंत प्रत्येक घरी शौचालय असेल दावा केला जात. मात्र २०१९ उजाळायला केवळ चार महिन्याचा कालावधी शिल्लक असल्याने हा दावा कितपत खरा ठरेल, याची कल्पना न केलेलीच बरी. बाबाटोलीवासीय फकीर असले तरी ते आज घडीला सालेकसा नगरपंचायतचे नागरिक व मतदार आहेत.
प्रत्येक निवडणुकीत ते मतदानाचा हक्क बजावितात. मात्र त्यांनाच मुलभूत सोयी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.या परिसरात महिला व मुली असून त्यांनाही सन्मानाने जगण्याची इच्छा आहे. परंतु निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे त्यांना सुध्दा विविध समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
आंघोळीला नाल्यावर जावे लागते परंतु महिला-मुली तिथे जाण्यास घाबरतात. अशात अनेक महिला आणि मुलींना राहण्याच्या ठिकाणीच उघड्यावर आंघोळ करुन घ्यावी लागते. येथील छोटी मुले तर आठ आठ दिवस आंघोळ करीत नाही. त्यामुळे त्यांना आजारांची लागण होत आहे.
मुलांचे आईवडील दिवसभर पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर असतात. त्यामुळे मुले दिवसभर बेवारस फिरत असतात किंवा शहरात येऊन भीख मागतात. मात्र हा परिसर आता सालेकसा नगर पंचायतमध्ये समाविष्ठ झाला आहे.
नगर रचनेप्रमाणे बाबाटोलीवासीयांना सुद्धा सोयी सुविधा व शासनाचा लाभ मिळण्याची गरज आहे. शिवाय स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाने सुध्दा याकडे लक्ष देवून बाबाटोलीवासीयांच्या समस्या दूर करण्याची गरज आहे.
ज्वलंत समस्या लक्षात घेता बाबाटोली येथे लवकरच सार्वजनिक शौचालयाची सोय करुन देण्यात येईल. त्यानंतर प्रत्येक घरी स्वतंत्र शौचालय तयार करण्यात येईल. बाबाटोलीतील समस्या नगर पंचायतच्या माध्यमातून लवकरच मार्गी लावू.
- उमेदलाल जैतवार, बांधकाम सभापती, न.प. सालेकसा