बीसी कांदा देतोय १२ गावातील कुटुंबांना रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 09:20 PM2019-06-22T21:20:58+5:302019-06-22T21:21:33+5:30
गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान सुपरिचीत आहे. या राष्ट्रीय उद्यानातील निसर्ग वैभव संपन्न ऐतिहासीक मालगुजारी तलावातील बीसी कांदे हे मागील ५० वर्षांपासून तलावात नैसर्गिकरित्या उपलब्ध आहेत. या बीसी काद्यांमुळे १२ गावातील हजारो कुटुंबांना रोजगार मिळत आहे.
रामदास बोरकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान सुपरिचीत आहे. या राष्ट्रीय उद्यानातील निसर्ग वैभव संपन्न ऐतिहासीक मालगुजारी तलावातील बीसी कांदे हे मागील ५० वर्षांपासून तलावात नैसर्गिकरित्या उपलब्ध आहेत. या बीसी काद्यांमुळे १२ गावातील हजारो कुटुंबांना रोजगार मिळत आहे. त्यामुळे तलावात तयार होणारे नैसर्गिक बीसी कांदे या गावातील नागरिकांसाठी एकप्रकारचे वरदानच ठरत आहे.
पोवन कांद्यांना वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. स्थानिक लोक याला बीसी कांदे म्हणून ओळखतात. महाराष्ट्रात इतर ठिकाणी पोवन कांदा, कमळकंद, छत्तीसगडमध्ये ढेस या नावाने ओळखले जाते. ४०-५० वर्षापूर्वी शेतीशिवाय दुसरा रोजगाराच नव्हता. लोकांना शेतीतून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नातूनच कुटूंबाना उदरनिर्वाह करावा लागत होता. मात्र ते सुध्दा पुरेसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे परिसरातील शेतकरीबांधव बीसी कांदा, जंगलातील मोहफुले मीठ टाकून उकडून, भाजून आपली भूक भागवित होते. भाजी करणे, वाळवण(खुला) करुन ठेवायचे. तसेच चिंचोळे,जंगलातील कडूकांदा, नाना माती कांदा, आणि तलावातील शिमनीफुल कांदा, गाद कांदा यासारखे कंदमूळे खाऊन स्थानिक व आदिवासी आपला उदरनिर्वाह करायचे. नवेगावबांध मालगुजारी तलावाच्या सभोवताल असलेल्या दुर्गम आदिवासी क्षेत्रातील जांभळी, येलोडी, रामपुरी, पवनीधाबे, राजीटोला, कान्होली, तिडका, पांढरवाणी, खोली, बोंडे, मुंगली, नवेगावबांध या १२ गावातील मासेमारी करणारे ढीवर समाजबांधव व इतर लोकांच्या उदरनिर्वाहाचे हे बीसी कांदे एक प्रमुख साधन बनले आहे. मार्चपासून ते जूनपर्यंत (पावसाला सुरूवात होईपर्यंत) हा कमळकंद तलावातून खणून काढून त्याची विक्री केली जाते.
१९९५ पासून झाली विक्रीस सुरुवात
पूर्वी अन्न म्हणून वापरात असलेल्या या बीसी कांद्याची विक्री १९९५ पासून सुरु झाली. तेव्हापासून हे बीसी कांदे या परिसरातील लोकांना चार महिने रोजगार मिळवून देण्याचे साधन झाले आहे. त्या वेळी पवनीधापे येथील धनराज नंदेश्वर, महादेव नंदेश्वर, चुडामन सोनवाने यांनी या कांदा खरेदीला सुरुवात केली. दोन रुपये प्रती किलो पासून खरेदी-विक्री केली जायची. आता बीसी कांदा २० रुपये प्रती किलो दराने खरेदी करुन त्याची जिल्ह्यातील बाजारपेठेत ३० ते ४० रुपये प्रती किलो प्रमाणे विक्री केली जाते. गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, रायपूरसह छत्तीसगड, मध्यप्रदेश या राज्यात या कांद्याला मोठी मागणी आहे. चंद्रपूर व गोंदिया येथील व्यापारी परिसरात हा बीसी कांदा खरेदी करतात. २०११ ला वनविभागाने या कांद्याच्या खाण्यावर आणि तलावातून कांदे काढण्यावर बंदी घातली होती. त्यानंतर पुन्हा तलावातून कांदे काढायला सुरुवात झाली.
महिन्याकाठी दहा ते पंधरा हजार रुपयांचे उत्पन्न
बीसी कांद्यामुळे या परिसरातील हजारो कुटूंबाना रोजगार मिळाला आहे. महिला दररोज तलावातून १० ते १५ किलो कांदे काढून २५० ते ३०० रुपये तर पुरुष मंडळी २० ते ४० किलो कांदे काढून ७०० ते ८०० रुपये कमवितात. मार्च ते जून या चार महिन्याच्या कालावधीत १० ते १५ हजार रुपयांचे उत्पन्न एका कुटुंबाला मिळते.
मासेमारी करणाऱ्या समाजाची उपजिवीका या तलावावर अवलंबून आहे. गोड्या पाण्यातील जैवविविधतेचे प्रचंड ज्ञान या समाजाकडे आहे. बीसी कांदे खणून काढल्यामुळे खड्डे तयार होतात. पावसाळ्यात याचा उपयोग वाघुर, दांडक यासारखे मुलकी मासे अंडी घालण्यासाठी करतात. दरवर्षी कमळकंद काढल्यामुळे ही वनस्पती बेसुमार तलावात वाढत नाही. त्यामुळे तलावातील इतर वनस्पतींना धोका नाही.ग्राम पंचायत पातळीवरील जैवविवधता समित्यांनी संवर्धनाची जबाबदारी घ्यावी.
- नंदलाल मेश्राम, पर्यावरण मित्र,जांभळी.