अतिक्रमण काढूनच बोडीचे सौंदर्यीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 09:19 PM2018-01-21T21:19:40+5:302018-01-21T21:19:55+5:30
शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील बोडीच्या सौंदर्यीकरणाचे काम नगर परिषदेने पुन्हा सुरू केले आहे. मात्र बोडीच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले असून हे अतिक्रमण अगोदर काढा व त्यानंतरच बोडीच्या सौंदर्यीकरणाचे काम करा.....
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील बोडीच्या सौंदर्यीकरणाचे काम नगर परिषदेने पुन्हा सुरू केले आहे. मात्र बोडीच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले असून हे अतिक्रमण अगोदर काढा व त्यानंतरच बोडीच्या सौंदर्यीकरणाचे काम करा अशी मागणी सिव्हील लाईन्स मधील नागरिकांनी केली आहे. यासाठी या नागरिकांनी नगर परिषद मुख्याधिकारी चंदन पाटील यांची बुधवारी (दि.१७) भेट घेऊन चर्चा केली व त्यांना निवेदन दिले.
सिव्हील लाईन्स परिसरातील बोडीची स्वच्छता व सौंदर्यीकरण व्हावे ही प्रत्येक सिव्हील लाईन्सवासींची मागणी आहे. सिव्हील लाईन्स परिसरातील नागरिकांच्या भावना या बोडीशी जुळलेल्या आहेत. यामुळेच शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत या बोडीच्या खोलीकरण व सौंदर्यीकरणाच्या कामाला सुरूवात करण्यात आली. यासाठी नगरोत्थान योजनेंतर्गत १.६२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शासनाच्या भूमी रेकॉर्डनुसार खसरा क्रमांक २०६ व २०७ मध्ये ही बोडी आहे. या जागेची मोजणी भूमी अभिलेख विभागाने चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे फक्त खसरा क्रमांक २०६ ज्यामध्ये २.२९ एकर जागा आहे याचीच मोजणी करण्यात आली. तर खसरा क्रमांक २०७ मधील १.३९ एकर जागेची मोजणी न करता चुकीचा अहवाल सरकारला देण्यात आला. या जागेवर अतिक्रमणकर्त्यांनी मलमा टाकून प्लॉट तयार केले व अवैधरित्या त्या जागेची रजिस्ट्री केल्याचे निवेदनात नमूद आहे.
परिणामी सुमारे ४ एकर जागेतील बोडी आता फक्त अडीच एकरात उरली आहे. नगर परिषदेने आता बोडीच्या खोलीकरण व सौंदर्यीकरणाचे काम सुरू केल्याने सिव्हील लाईन्स परिसरातील प्रतिष्ठीत नागरीक झलकसिंह बिसेन, मनोहर ठाकूर, ताराचंद तावाडे, नगरसेवक शकील मंसुरी, सुनील तिवारी, क्रांती जायस्वाल आदिंनी मुख्याधिकारी पाटील यांची बुधवारी (दि.१७) भेट घेतली. या भेटीत नागरिकांनी जागेची पुन्हा मोजणी करणे तसेच करण्यात आलेले अतिक्रमण काढूनच बोडीचे काम करावे अशी मागणी केली आहे. एकदा हे काम पूर्ण झाल्यानंतर अतिक्रमण काढता येणार नाही. त्यामुळे लागल्या हाती अतिक्रमण काढावे अशी मागणी नागरिकांनी निवेदनातून केली आहे.
आताही तीच परिस्थिती
सन २००९ मध्ये नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती गोपाल एच. अग्रवाल यांच्या कार्यकाळात वैशिष्टपूर्ण योजनेतून बोडी सौंदर्यीकरणासाठी निधी मंजूर करण्यात आला होता. तेव्हा अग्रवाल यांनी बोडीचे काम सुरू करवून घेतले होते. त्यात बोडी खोलीकरण व सुरक्षा भिंतीचे सुमारे २३ लाख रूपयांचे काम झाले. मात्र अतिक्रमण करण्यात आलेल्या जागेचा विषय घेऊन सुरक्षा भिंतीचे काम अडले. अग्रवाल यांनी अतिक्रमण हटविण्यासाठी कारवाई करण्यास सांगीतले होते. मात्र त्या दरम्यान त्यांचा कार्यकाळ संपल्याची माहिती आहे. त्यानंतर आलेल्या अन्य पदाधिकाऱ्यांनी बोडीच्या या विषयाकडे लक्ष दिले नाही. परिणामी बोडीचा विषय एवढे वर्ष पेंडींग होता. आता विद्यमान पदाधिकाऱ्यांनी बोडीचा विषय हाती घेतला. मात्र येथे अतिक्रमणाचा विषय अगोदर सोडविणे गरजेचे होते व ते झाले नाही. परिणामी सन २००९ मध्ये होती तीच परिस्थिती आता ही निर्माण झाली आहे.
फौजदारी नियमानुसार कारवाई करा
बोडीच्या जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्यासाठी नगर परिषदेने यापुर्वीही आदेश काढले होते. पण, पाणी कोठे मुरले व काय झाले कुणास ठाऊक, हे काम मधातच बंद पडले. दरम्यान आता मोठा कार्यक्रम घेऊन गाजावाजा करून बोडीचे काम पुन्हा सुरू करण्यात आले. मात्र आता पुन्हा बोडीच्या जागेवरील अतिक्रमणाचा मुद्दा सुटलेला नाही. त्यामुळे यावर कायम तोडगा काढण्यासाठी फौजदारी नियमानुसार कारवाई करा अशी मागणी झलकसिंह बिसेन, मनोहर ठाकूर, ताराचंद तावाडे यांच्यासह सिव्हील लाईन्स परिसरातील नागरिकांनी केली आहे.