पीएम किसान योजनेचे लाभार्थी आले अर्ध्यावर; जिल्ह्यातील एक लाखांवर शेतकरी वगळले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 04:09 PM2024-11-29T16:09:28+5:302024-11-29T16:41:26+5:30
सर्वेक्षण मोहिमेचा परिणाम : १ लाख ९ हजार १६४ शेतकऱ्यांना मिळाला १७ वा हप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात एकूण २ लाख ७६ हजार खातेदार शेतकरी आहेत. पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपये अनुदान दिले जाते. जेव्हा ही योजना लागू करण्यात आली, तेव्हा या योजनेचे २ लाख २० हजारांवर लाभार्थी होते, पण या योजनेचा लाभ पात्र नसलेले शेतकरीसुद्धा घेत होते. त्यामुळे महसूल विभागाने योग्य पात्र लाभार्थी शेतकऱ्याला योजनेचा लाभ मिळावा यासाठी व्यापक सर्वेक्षण मोहीम राबविली. त्यात जवळपास १ लाख १० हजारांवर शेतकरी वगळले गेले असून लाभार्थी अर्ध्यावर आले आहेत.
पीएम किसान योजनेचा १७ व्या हप्त्याचा लाभ केवळ १ लाख ९ हजार १६४ शेतकऱ्यांना मिळाला आहे. ही आकडेवारी कृषी विभागाची आहे. विशेष म्हणजे या योजनेचा १८ वा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू असून तो लवकरच जमा होणार आहे. केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनानेसुद्धा शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली.
दोन्ही योजनांचे मिळून शेतकऱ्यांना एकूण १२ हजार रुपयांचे अनुदान मिळत आहे, पण या योजनेचा लाभ एकाच कुटुंबातील सात-बारावर नावे असलेले तीन-चार व्यक्ती घेत होते, तर आयकर भरणारे, पती-पत्नी हेसुद्धा लाभ घेत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली. त्यामुळे योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात जवळपास १ लाख १० हजारांवर लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या घटल्याचे चित्र आहे, तर आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून उचल केलेल्या हप्त्यांची रक्कम वसूल करण्याची प्रक्रियासुद्धा सुर करण्यात आली आहे. आतापर्यंत २९३४ शेतकऱ्यांकडून दीड कोटी रुपये वसूल करण्यात आल्याची माहिती आहे.
अनेक शेतकऱ्यांचे खाते क्रमांक जुळेना
महसूल विभागाने पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे सर्वेक्षण केले असता त्यात अनेक शेतकऱ्यांचे सात-बारावरील खाते क्रमांक जुळत नव्हते, तर काही शेतकऱ्यांचे रहिवासी पत्ते, काही मृतक शेतकऱ्यांच्या नावावरसुद्धा अनुदान जमा केले जात असल्याचे आढळले. त्यामुळे ही सर्व नावे वगळल्याने या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या अर्ध्यावर आली आहे.
१७ व्या हप्त्याची रक्कम जमा झालेल्या शेतकऱ्यांची तालुकानिहाय संख्या
तालुका शेतकरी संख्या
आमगाव १३७०५
अर्जुनी मोरगाव १३११८
गोंदिया २०२०४
गोरेगाव ११९४४
सडक अर्जुनी १२९०८
सालेकसा ९२२५
तिरोडा १८५५६
एकूण १०९१६४