विनाकारण गावात मोकाट फिराल तर सावधान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:29 AM2021-04-16T04:29:10+5:302021-04-16T04:29:10+5:30
केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी येथे गुरुवारपासून पुढील पाच दिवसांपर्यंत कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यासह तालुका प्रशासनाने दिलेल्या सूचना ...
केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी येथे गुरुवारपासून पुढील पाच दिवसांपर्यंत कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यासह तालुका प्रशासनाने दिलेल्या सूचना संदर्भाने स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन आणि पोलीस ठाण्याच्या संयुक्तवतीने कडक संचारबंदीची घोषणा केली आहे. त्यानुसार व्यापारी व दुकानदारांनी १०० टक्के प्रतिसाद दिला आहे. या संचारबंदी दरम्यान विनाकारण गावात मोकाट फिरणारे आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा ठाणेदार संदीप इंगळे यांनी दिला आहे.
कोरोना विषाणूच्या महामारीने या परिसरात उग्ररूप धारण केल्यामुळे येथील आठवडी बाजार गेल्या १५ दिवसांपासून बंद करण्यात आले असून, शनिवार आणि रविवारला पुढील आदेशापर्यंत येथील बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. फक्त औषधी दुकाने आणि दवाखाने सुरू असतील. शासनाने आपत्ती व्यवस्थापन आणि साथरोग नियंत्रण अधिनियमांची काटेकोरपणे पालन करण्यासंदर्भात दिलेल्या सूचनेनुसार येथे गुरुवारपासून कडक संचारबंदी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी चौकाचौकांत पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. काही लोक वेगवेगळ्या सबबीखाली गावात विनाकारण मोकाट फिरण्याचा प्रयत्न करीत असतात अशा विनाकारण भटकंती करणाऱ्या लोकांवर ठाणेदार संदीप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तैनात असलेले पोलीस कर्मचारी कडक कारवाई करणार आहेत.
.....
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून घरच्या घरीच सुरक्षित राहावे, विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये, स्वत:ची काळजी स्वत:च घ्यावी.
नंदू पाटील गहाणे केशोरी, सरपंच