बीजीडब्ल्यू रुग्णालयातील रुग्णांचा जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 11:58 PM2019-03-23T23:58:44+5:302019-03-23T23:59:33+5:30
येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात (बीजीडब्ल्यू) रुग्णालयात पावसाळ्यात गुडघाभर पाणी साचल्यानंतर या रुग्णालयातील अनागोंदी कारभार पुढे आला होता. त्यानंतर यावर बरीेच टीका झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने या इमारतीचे नागपूर येथील व्हीएनआयटी संस्थेमार्फत स्ट्रक्चरल आॅडिट केले होते. त्यात ही इमारत जीर्ण झाली असून ती पाडण्यास सांगितले होते.
अंकुश गुंडावार।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात (बीजीडब्ल्यू) रुग्णालयात पावसाळ्यात गुडघाभर पाणी साचल्यानंतर या रुग्णालयातील अनागोंदी कारभार पुढे आला होता. त्यानंतर यावर बरीेच टीका झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने या इमारतीचे नागपूर येथील व्हीएनआयटी संस्थेमार्फत स्ट्रक्चरल आॅडिट केले होते. त्यात ही इमारत जीर्ण झाली असून ती पाडण्यास सांगितले होते.मात्र याला आठ महिन्यांचा कालावधी लोटूनही अद्यापही इमारत पाडण्यासंदर्भात कुठलाच प्रस्ताव पाठविण्यात आला नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. याप्रकारामुळे मात्र शेकडो रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.
जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना वेळीच उपचार मिळावा, यासाठी शासनाने गोंदिया येथे बाई गंगाबाई महिला रुग्णालय सुरु केले.रूग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम १९३९ मध्ये करण्यात आले.एकूण दोनशे खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयात सध्या केवळ १८५ खाटाच उपलब्ध आहे. त्यामुळे बरेचदा दाखल रुग्णांची सख्या वाढल्यास त्यांना रुग्णालयाच्या वºहांड्यात खाटा लावून दाखल केले जाते. रुग्णालयाच्या इमारतीला ८१ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे ही इमारत सुध्दा जीर्ण झाली असून पावसाळ्यात काही ठिकाणी गळती सुध्दा लागते.
या रूग्णालयात महिला तसेच लहान बालकांना दाखल करुन उपचार केले जाते. मागील वर्षी जुुलै महिन्यात या रुग्णालयाच्या प्रसूती वार्डात गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची चांगलीच धावपळ उडाली होती. शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी रुग्णालयाकडे धाव घेत रुग्णालयातील वार्डात साचलेले पाणी बाहेर काढण्यास मदत केली. सुदैवाने यामुळे कुठलीही अनुचित घटना घडली नाही. मात्र या वार्डालगत शिशु वार्ड असून वार्डात सालेल्या पाण्यामुळे त्यांना संसर्ग होण्याची शक्यता सुध्दा नाकारता येत नव्हती.
यासर्व प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनाची पुन्हा एकदा पोलखोल झाली. तेव्हा बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या प्रशासनाने इमारत जुनी व जीर्ण झाली असल्याने स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात यावे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला २०१५ पासून वांरवार पत्र दिले. मात्र बांधकाम विभागाने इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट केले नव्हते. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर त्याची मुख्यमंत्र्यांनी दखल घेत दोन दिवसात याप्रकरणी संपूर्ण अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी व वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बीजीडब्ल्यूला भेट देऊन तेथील समस्यांचा आढावा घेतला होता.
इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यासाठी नागपूर येथील व्हीएनआयटी या संस्थेची निवड करण्यात आली होती. या संस्थेने इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करुन त्याचा अहवाल बीजीडब्ल्यू रुग्णालय प्रशासन व जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता. त्यात या रुग्णालयाची इमारत जीर्ण झाली असून ती वापर करण्यायोग्य नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे ही इमारत पाडण्याचा शेरा मारला होता.आता याला आठ महिन्यांचा कालावधी लोटला मात्र अद्यापही कुठलीच कारवाही करण्यात आली नाही.
विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्यापही ही इमारत पाडण्यासाठी प्रस्तावच तयार केला नसल्याची माहिती आहे. तर रुग्णालय प्रशासन सुध्दा हातावर हात ठेवून गप्प आहे.
जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची
बीजीडब्ल्यू रुग्णालयाचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आल्यानंतर त्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठविण्यात आला. रुग्णालयाची इमारत पाडण्याचा प्रस्ताव तयार करुन पाठविण्याची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याचे सांगत आता रुग्णालय प्रशासनाने आपले हात झटकले आहेत.
तीन अधिकारी बदलले
बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या इमारतीचा मुद्दा गंभीर असताना सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रुग्णालय प्रशासन जबाबदारी कुणाची यावरुन हात झटकत आहे. तर मागील आठ महिन्यांच्या कालावधीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे ३ कार्यकारी अभियंता बदलले. त्यामुळे आधीच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी कुठली कारवाही किंवा प्रस्ताव तयार केला हे सध्या रूजू असलेल्या अधिकाºयांना माहिती नाही.
शेरा मारुन विभाग मोकळा
बीजीडब्ल्यू रूग्णालयाच्या महिला वार्डात पाणी साचल्याच्या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी भेट देवून इमारतीची पाहणी केली होती. तसेच रुग्णालयाची इमारत ८१ वर्षे जुनी असून रस्त्यापेक्षा इमारत दोन फूट खाली असल्याने रुग्णालयाच्या वार्डात पाणी साचल्याचे उत्तर व शेरा मारुन तो शासन आणि प्रशासनाला पाठवून मोकळे होण्यातच धन्यता मानली. त्यापुढे कुठलाच प्रस्ताव तयार करुन तो शासनाकडे पाठविण्यात आला नसल्याची कबुली या विभागाचे वरिष्ठ अधिकारी स्वत:च देत आहे.
विजेची समस्या कायम
बीजीडब्ल्यू रुग्णालयातील सोनोग्राफी विभागात अद्यापही पर्यायी जनरेटर आणि युपीएस उपलब्ध करुन देण्यात आले नाही. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्यास सोनोग्राफी काढण्याचे व रुग्णांना प्रमाणपत्र देण्याचे काम पूर्णपणे ठप्प होते. त्यामुळे रुग्णांना बरेचदा मनस्ताप सहन करावा लागतो. तर आठवडाभरापूर्वीच या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना पत्र देऊन शिशु वार्डात बंद असलेल्या मशिन आणि यंत्रसामुग्रीची दुरूस्ती आणि जनरेटर उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. त्यामुळे या रुग्णालयातील समस्या अद्यापही कायम असल्याचे चित्र आहे.
महिला रुग्ण व बालकांचा जीव धोक्यात
बीजीडब्ल्यू रुग्णालयाची इमारत जीर्ण झाली असल्याची बाब स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये स्पष्ट झाली आहे. मात्र यानंतरही याच इमारतीतून रुग्णालयाचा कारभार सुरू आहे. या रुग्णालयात सर्वाधिक महिला आणि बालरुग्ण दाखल असतात. त्यामुळे या दोन्ही विभागाच्या दिंरगाई आणि दुर्लक्षीत धोरणामुळे महिला रुग्ण आणि बालकांचा जीव धोक्यात आला आहे.
बीजीडब्ल्यूच्या इमारतीचे स्ट्रक्चर आॅडिट केल्यानंतर त्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठविण्यात आला. अहवालानुसार इमारत पाडण्याची व त्यासंबंधीचा अहवाल तयार करुन शासनाकडे पाठविण्याची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे.
- व्ही.पी.रुखमोडे, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.
बीजीडब्ल्यू रुग्णालयाची जीर्ण इमारत पाडण्यासंदर्भात अद्यापही कुठलाच प्रस्ताव तयार करुन पाठविण्यात आलेला नाही. मी नुकताच रुजू झालो आहे, याची माहिती घेतो.
- मिथिलेश चव्हाण, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग गोंदिया.