भावेंना भावली नाही गोंदिया नगर पालिका

By admin | Published: March 21, 2016 01:36 AM2016-03-21T01:36:47+5:302016-03-21T01:36:47+5:30

नगर परिषदेचे सहायक खरेदी पर्यवेक्षक आपल्या मर्जीने वैद्यकीय रजेवर गेले असतानाच आता नगर परिषद अभियंता

Bhavnana Bharti is not Gondia Municipality | भावेंना भावली नाही गोंदिया नगर पालिका

भावेंना भावली नाही गोंदिया नगर पालिका

Next

गोंदिया : नगर परिषदेचे सहायक खरेदी पर्यवेक्षक आपल्या मर्जीने वैद्यकीय रजेवर गेले असतानाच आता नगर परिषद अभियंता (एमई) हे सुद्धा वैद्यकीय रजेवर गेले आहेत. एमई रजेवर गेले तर गेले मात्र त्यांचा प्रभार कुणी घेण्यास तयार नसल्याने चांगलीच सर्कस नगर परिषदेत बघावयास मिळाली. शेवटी कनिष्ठ अभियंता कावडे यांच्याकडे एमईंचा प्रभार देण्यात आला आहे.
बांधकाम विभागाबाबत जास्त सांगणे काही बरे नाही. मात्र येथील नगर परिषदेच्या बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता पदावर काय लागले आहे कुणास ठाऊक या खुर्चीवर कुणी बसायला तयार नसल्याचे दिसते. त्याचे असे की, नगर परिषद अभियंता पदावर मागील आठ-नऊ महिन्यांपूर्वी अनिरूद्ध भावे आलेत. त्यांना आता वर्षभर झाला नसतानाही ते २६ फेब्रुवारीपासून वैद्यकीय रजेवर गेले आहेत. परिणामी बांधकाम विभागाचा संपूर्ण कारभारच वाऱ्यावर आला होता. आता आर्थिक वर्ष सरत असून विभागाची कामे व कंत्राटदारांचे बिल अडकल्याने त्यांचाही जीव टांगणीला आला होता.
एकीकडे सहायक खरेदी पर्यवेक्षक खोब्रागडे हे सुद्धा आपल्या मर्जीने सुटीवर गेले आहेत. त्यांच्या गेल्याने खरेदी विभागाचीही फसगत झाली होती. तर दुसरीकडे बांधकाम विभागाचे प्रमुखच सुटीवर गेल्याने या विभागाचाही कुणी वाली नव्हता. वरिल सर्व चित्र बघता पालिकेत कर्मचाऱ्यांचा मनमर्जी कारभार चालत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे भावे येथील नगर परिषदेत रूजू झाल्यापासूनच जास्त काळ त्यांनी सुटीवरच घालविला असल्याचे कळले. यातून त्यांना गोंदिया नगर परिषद भावली नसल्याचेही बोलले जात आहे. आता ते वैद्यकीय सुट्टीवर असल्याने सुट्टीवरून कधी परत येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)

यापूर्वीचे एमईही निसटले
भावे यांनीच सुटी टाकून नगर परिषदेपासून सुटका करवून घेतल्याचा पहिला प्रकार नाही. यापूर्वी गहूकर हे नगर परिषद अभियंता म्हणून आले असता त्यांनी वर्षभरातच येथून रामराम ठोकला. त्यांच्या नंतर डवले नामक अभियंता आले, त्यांच्याकडे एमईंचा प्रभार होता अशी माहिती आहे. त्यांचीही बदली झाली व ते ही येथून निघून गेले. आता भावे यांनाही वर्ष झाले नसून त्यांचीही येथे काम करण्याची इच्छा नसल्याने ते सुटी टाक त असल्याचे पालिकेत बोलले जात आहे.
प्रभार देण्यासाठी चांगलीच सर्कस
भावे सुटीवर गेल्याने बांधकाम विभागाचे काम अडकले होते. अशात त्यांचा प्रभार कनिष्ठ अभियंता कावडे यांना देण्यात आला होता. मात्र कावडे यांनी प्रभार घेण्यास नकार दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता डी.आर.बारई यांच्याकडे प्रभार देण्याचे पत्र ८ मार्च रोजी काढण्यात आले. मात्र बारई यांचीही येथे काम करण्याची इच्छा नसावी व म्हणूनच त्यांनीही प्रभार घेतला नाही. त्यांची मनधरणी करण्यासाठी कंत्राटदार सुद्धा त्यांच्या भेटीला गेले असल्याची माहिती आहे. दरम्यान आर्थिक वर्षाचा शेवट असून कामाचा ताण असल्याने त्यांना सोडण्यात येणार नसल्याने बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडून पत्र निघाल्याची माहिती आहे. परिणामी फिरून शेवटी परत कावडे यांनाच प्रभार स्वीकारावा लागला.

Web Title: Bhavnana Bharti is not Gondia Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.