केशोरी : पथदिव्यांच्या थकीत वीजबिलाचा भरणा ग्रामपंचायत करणार नाही या मागणीसह अर्जुनी-मोरगाव तालुका सरपंच-उपसरपंच संघटनेने लढा उभारून जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्यामार्फत शासनाला निवेदन पाठविले होते. शासनाने या लढ्याची दखल घेऊन पथदिव्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतल्याने पथदिव्यांच्या थकीत बिलाचा तिढा सुटला आहे. लवकरच गावातील सार्वजनिक पथदिवे प्रकाशमान होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सरपंच नंदू पाटील गहाणे यांनी सांगितले.
सार्वजनिक पथदिव्यांचा वीजपुरवठा वीज वितरण कंपनीने बंद केला होता. तेव्हापासून केशोरीसह परिसरातील सर्वच गावे अंधारमय झाली होती. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात अंधाराचा सामना करावा लागत होता. शासनाने १५व्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधीतून पथदिव्यांच्या थकीत वीजबिलाचा भरणा करावा, असे आदेश निर्गमित केले होते. परंतु त्या निधीतून गावातील अनेक विकासकामांवर खर्च करण्याचा आराखडा तयार करून ग्रामपंचायतीने गाव विकासात्मक नियोजन केले होते. यामुळे तालुका सरपंच-उपसरपंच संघटनेने १५व्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधीतून कोणतीही ग्रामपंचायत सार्वजनिक पथदिव्यांच्या थकीत बिलाचा भरणा करणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला.
तसेच वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत पालकमंत्री, ऊर्जामंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले होते. सरपंच संघटनेच्या लढ्याची नोंद घेऊन शासनाने पथदिव्यांचा खंडित केलेला वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे सरपंच संघटनेकडून सांगण्यात आले. परंतु निर्णयाचे आदेश संबंधित विभागाला पोहचले नसून शासन आदेशाची वाट वीज वितरण कंपनी बघत आहे. शासनाचे आदेश प्राप्त होताच पथदिव्यांचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू होणार आहे.