गोंदिया : पाच व सहा वर्षात पैसे दामदुप्पट करून देण्याच्या नावावर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड व आंध्र प्रदेश या चार राज्यातील खातेदारांकडून पीएसीएल कंपनीने पैसे घेऊन त्यांना मॅच्युरिटीनंतर पैसे दिले नाही. एकट्या गोंदिया शाखेने १ कोटी ७ लाख रुपयांची मॅच्युरिटी रक्कम ग्राहकांना परत केली नाही. कंपनीकडून पैसे कधी मिळणार याच प्रतीक्षेत ग्राहक आहेत.
पीएसीएल या कंपनीने देशभरातील ग्राहकांना मॅच्युरिटीचे पैसे न दिल्यामुळे ४५ हजार कोेटींचा अपहार झाल्याचा गुन्हा सीबीआयने (केंद्रीय अन्वेषण विभागाने) या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या कंपनीने देशभरात उघडलेल्या शाखांच्या ठिकाणाहून ग्राहकांच्या तक्रारी येण्यास सुरुवात झाली. दरम्यान, कंपनीकडून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हजारो ग्राहकांची झोप उडाली. गोंदिया जिल्ह्यातील शेकडो ग्राहकांचे १ कोटी रुपयांच्यावर पैसे बुडाले.
पाच वर्षात दामदुप्पट पैसे करून देण्याच्या नावावर पीएसीएल इंडिया लिमिटेड या कंपनीची गोंदियात १९९८ पासून सुरुवात झाली. या कंपनीने सुरुवातीपासून सन २०१२ पर्यंत असलेल्या सर्व ग्राहकांना नियमित मॅच्युरिटी दिली आहे. त्यानंतरच्या खातेदारांना मॅच्युरिटी दिली नसल्याने २०१३ पासून आतापर्यंतच्या मॅचुरिटी झालेल्या ग्राहकांना त्यांचे पैसे मिळाले नाही. ग्राहकांनी या कंपनीच्या गोंदिया शाखेकडे जमा केलेली रक्कम १ कोटी ७ लाख रुपयांची रक्कम अद्यापही त्यांना मिळाली नाही. या कंपनीशी ७०० एजंट जुळलेले आहेत. या एजंटनी मध्य प्रदेशचा बालाघाट, मलाजखंड, छत्तीसगडचा राजनांदगाव, डोंगरगड, आंध्र प्रदेश, महाराष्ट्रातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यातील हजारो खातेदारांना मॅच्युरिटी दिली नाही. परिणामी त्या कंपनीच्या विरोधात पोलिसात तक्रार नोंदविली. गोंदिया शाखेतील २२५ ग्राहकांनी पोलिसात तक्रार केली होती. ग्राहकांचे १ कोटी ७ लाख रुपये कंपनीकडून केव्हा परत मिळणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. सहा महिन्यांपूर्वी पीएसएलचे पैसे मिळणार म्हणून ग्राहकांना आपाले अर्ज ऑनलाईन करा अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे आपली कागदपत्रे त्या ग्राहकांनी ऑनलाईन केली होती. परंतु आतापर्यंत त्या ग्राहकांना पीएसीएलचा पैसा मिळाला नाही.
बॉक्स
नागरिकांची लूट सुरूच
गोंदिया जिल्ह्यातील ग्राहकांना पैसे दामदुप्पट करून देण्याच्या नावावर पीएसीएल या कंपनीकडून फसवणूक करण्यात आली. या कंपनीसारख्याच आणखी काही कंपन्या गोंदियात आहेत. खातेदार वारंवार कार्यालयाचे हेलपाटे मारून पॉलिसी विड्राल करण्याची मागणी करतात तेव्हा या कंपन्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे. त्यामुळे अशा कंपन्यांवर वेळीच कारवाई होण्याची गरज आहे.